योजनांचा जागर उपक्रमाबाबत मुख्याध्यापक कार्यशाळा संपन्न

योजनांचा जागर उपक्रमाबाबत मुख्याध्यापक कार्यशाळा संपन्न

*कोकण Express*

*योजनांचा जागर उपक्रमाबाबत मुख्याध्यापक कार्यशाळा संपन्न*

*माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख व शिक्षणाधिकारी (योजना ) श्री. कुडाळकर साहेब यांचे मार्गदर्शन*

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी विद्यार्थी हिताच्या विविध शिष्यवृत्त्या व योजना पालक आणि विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी’योजनांचा जागर’हा उपक्रम राबविला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी मा. डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्री. प्रजित नायर, मुख्यकार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या प्रेरणेने शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा ओरोस पतपेढी येथे संपन्न झाली. या कार्यशाळेस १९२ मुख्याध्यापक उपस्थित होते. या कार्यशाळेस माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी (योजना) मा. श्री. प्रदिपकुमार कुडाळकर साहेब, विस्तार अधिकारी श्रीमती आवटी मॅडम,
श्रीमती सुषमा खराडे मॅडम, श्रीमती
स्मिता नलावडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. मुश्ताक शेख यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळणारी खुली शिष्यवृत्ती, आर्थिक मागास गटातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाची गुणवत्ता शिष्यवृत्ती, माजी सैनिक मुलांना शिष्यवृत्ती, स्वातंत्र्य सैनिक मुलांना शिष्यवृत्ती या बाबत माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. तसेच संच मान्यता, समायोजन, विद्यार्थी प्रवेश, शिक्षक-शिक्षकेतर भरती याबाबत माहिती दिली.
मा. श्री. प्रदिपकुमार कुडाळकर साहेब यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती, राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना, दिव्यांग मुलांना मिळणारी प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती, भारत सरकारची संस्कृत शिष्यवृत्ती ,नवभारत साक्षरता उपक्रम,
उपस्थिती भत्ता, इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती, अशा प्रकारे विविध शिष्यवृत्त्या बाबत माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी श्रीमती आवटी मॅडम यांनी धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या, बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती याबाबत माहिती दिली. समग्र शिक्षा अभियान सहा. कार्यक्रम अधिकारी श्रीमती स्मिता नलावडे मॅडम यांनी पुस्तकपेढी योजनेबाबत माहिती दिली. लेखाधिकारी शालेय पोषण आहार श्रीमती. सुषमा खराडे मॅडम यांनी पोषण आहार योजनेबाबत माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत एकूण ४0विविध योजनांची माहिती देण्यात आली.माध्यमिक शिक्षण विभाग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने या उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले. या कार्यशाळेचे औचित्य साधून माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आणि शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विस्तार अधिकारी श्री. थोरात साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री. गुरुदास कुसगांवकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शेवटी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!