*कोकण Express*
*लोकांसाठी काम केल्याने राजर्षि शाहूंना लोकराजा ही पदवी मिळाली ; डॉ. राज ताडेराव*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे सांस्कृतिक विभागामार्फत राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजर्षि शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.राज ताडेराव बोलत होते. घाटगे घराण्यातील दत्तक यशवंताने बहुजन समाजाला यशवंत केले आणि शाहू हे नाव आपल्या कर्तुत्वाने समाजप्रिय केले. धाडसी खेळांची आवडता त्यांना लहानपणापासूनच होती. अवघे ४८ वर्षे जीवन लाभलेल्या या राजाने स्वकर्तुत्वाने किती जगला यापेक्षा कसे जगावे हे दाखवून दिले. भारताबाहेर सुद्धा या राजाचा डंका वाजला. विचारसरणीतला पुरोगामीपणा सर्वश्रुत होता. जातीचे बोर्ड लावून आपल्या जातीचा उदो उदो करणारे राजे नव्हते. सर्वांना शिक्षण खुले झाले पाहिजे यासाठी ते आग्रही होते. जातीच्या वाट्याला आलेलेच व्यवसाय केले पाहिजेत हे बंधन त्यांनी झुगारून देण्यासाठी समाजात काम केले. हे सगळं अशिक्षितपणामुळे होते त्यामुळे बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार त्यांनी केला. शिक्षणासाठी वसतीगृहांची निर्मिती केली. मागासवर्गीयांना शिक्षणात ५० टक्के आरक्षण दिले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. विधवा विवाहाची प्रथा बंद करून पुनर्विवाहाला कायद्याने संरक्षण दिले. बहुजनांनी उद्योगाकडे वळले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. बहुजनांना न्याय देण्याचे काम केले म्हणून ते लोकराजा झाले. असे प्रतिपादन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत म्हणाले की शाहू महाराजांनी शिक्षणाचा केलेला प्रसार आणि प्रचार मोठा आहे. समाजाच्या प्रगतीची नाळ कोणती ती ओळखून त्यांनी काम केले. त्यामुळे समाजाला उपयुक्त काम झाले. आजच्या काळातही शिक्षणाचा प्रसार आणि प्रचाराची आवश्यक आहे ते काम आपण केले तर शाहूंचे कार्य पुढे नेण्याचे काम होईल.अशी सदिच्छा व्यक्त केली.
त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनोद पाटील यांनी केले तर आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.