*कोकण Express*
*तिथवली-चिंचवली पुलासाठी खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीतर्फे चंद्रकांत पाटील यांना निवेदन*
*खाखारेपाट ः प्रतिनिधी*
तिथवली तालुका वैभववाडी आणि चिंचवली तालुका कणकवली या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या सुख नदीवर मंजूर असलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे या मागणीचे निवेदन खारेपाटण रोड-चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीमार्फत ७ जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना देण्यात आले.
या दोन गावांच्या दरम्यान नदीवर पूल व्हावे अशी स्वातंत्र्यापासून या परिसरातील जनतेची मागणी आहे. चिंचवली येथे कोकण रेल्वेने खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन उभारले आहे.परंतु वैभववाडी व राजापूर या तालुक्यातील जनतेला या स्टेशनवर येण्यासाठी बारा किलोमीटरचा वळसा घालून यावे लागते. लोकांची ही मागणी लक्षात घेऊन कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी जून २०१९ मध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून हा पूल मंजूर करून घेतला. त्यासाठी पाच कोटी रुपये एवढ्या निधीची देखील तरतूद करण्यात आली. मात्र अद्यापही संबंधित विभागामार्फत पुलाच्या कामासंदर्भात कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. म्हणूनच ७ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे लक्ष या निवेदनाद्वारे या प्रश्नाकडे वेधण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली,आमदार नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत,संघर्ष समितीचे अध्यक्ष नासीर काझी, उपाध्यक्ष श्रीकांत भालेकर, सचिव सूर्यकांत भालेकर आदी उपस्थित होते.येत्या पंधरा दिवसांत या पुलाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यावेळी दिले.

