*कोकण Express*
*‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे सर्वच विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे*
*जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी*
*सिंधुदुर्गनगरी*
मंगळवारी 6 जून रोजी मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे सर्वच विभागांनी कोटेकोरपणे नियोजन करावे. दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली.*
कुडाळ तहसीलदार कार्यालयात आज आढावा बैठक झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, लाभार्थ्यांना कार्यक्रमास्थळी आणण्यासाठी एसटी विभागाने नियोजन करावे. एसटीमध्ये पाणी, नाश्ता तसेच प्राथमिक उपचार पेटी आवश्यक आहे.
आरोग्य शिबीराचे आयोजन
कार्यक्रमस्थळी आरोग्य विभागाने आरोग्य शिबीर घ्यावे. त्यासाठी त्यांना स्टॉल देण्यात येणार आहे. त्या ठिकाणी आरोग्य तपासणी करावी. त्यासाठी आरोग्य पथक, डॉक्टर्स, परिचारिका यांची नेमणूक करावी. कार्यक्रमस्थळी आवश्यक सुसज्ज रुग्णवाहिका ठेवाव्यात, अशी सूचनाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, सहायक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच त्याबाबतच्या तयारीचा आढावाही घेतला.
रोजगार मेळाव्याच्या अनुषंगानेही कौशल्य विकास, जिल्हा उद्योग केंद्र, तसेच अग्रणी जिल्हा व्यवस्थापक यांनी नियोजन करावे. नगरपालिकेने स्वच्छता गृहाची शौचालयांची तसे कचरा निर्मूलनाची सोय करावी. कार्यक्रमास्थळी पाणी, जेवण याचे व्यवस्थित जागेवर वितरण होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्था विभागाने स्वयंसेवकांची नियुक्ती करावी.
पोलीस अधीक्षक श्री. अग्रवाल म्हणाले, वाहतुकीचे नियोजन अत्यंत महत्वाचे आहे. पावसाच्या दृष्टीनेही तयारी ठेवावी. वाहनाच्या पार्किगची विशेष सुविधा ठेवावी. कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कार्यक्रमास्थळी असणाऱ्या स्टॉलबाबत आढावा दिला. कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे आणि तहसीलदार अमोल पाठक यांनी स्वत: नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. बैठकीतीत कार्यक्रमास्थळी प्रत्यक्ष जात सुरु असणाऱ्या नियोजनाची पाहणीही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि विभाग प्रमुखांनी केली.
00000