*कोकण Express*
*ग्रेस गुण तसेच अन्य प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ…*
*शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आश्वासन ; शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट…*
*मालवण ः प्रतिनिधी*
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळावेत तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक भरती पोर्टल संदर्भात महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी याबाबत येत्या दोन दिवसात अधिकारी वर्गाची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन श्रीमती गायकवाड यांनी शिष्टमंडळास दिले. अशी माहिती क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली.
राज्यात इयत्ता सहावी ते दहावी, बारावीच्या दरम्यान शासन मान्य क्रीडा स्पर्धेत सहभागी व पदक विजेत्या शालेय खेळाडूंना दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ग्रेस गुणाची तरतुद आहे. हे गुण मिळण्यासाठी संबंधित खेळाडूने इयत्ता दहावी, बारावीमध्येही संबंधित क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याची अट शासन परिपत्रकात आहे. परंतु सन २०२०- २१ या शैक्षणिक वर्षात कोरोना महामारीमुळे राज्यात क्रीडा स्पर्धाच झालेल्या नाहीत. त्यामुळे इयत्ता सहावी ते नववीपर्यंत हे गुण मिळण्यास पात्र असलेल्या शालेय खेळाडूंना बोर्डाच्या परिक्षेत गुण मिळणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पात्र शालेय खेळाडू या गुणांपासून वंचित न राहता त्यांना हे गुण मिळालेच पाहिजे यासाठी आज महाराष्ट राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाने राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड याची भेट घेत निवेदन सादर केले.
यावेळी झालेल्या चर्चेत या ग्रेस गुणाबरोबरच शारीरिक शिक्षण शिक्षक भरती पोर्टल संदर्भातही चर्चा झाली. या संदर्भात येत्या दोन तीन दिवसात अधिकारी वर्गाच्या बैठकीत हे विषय घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन श्रीमती गायकवाड यांनी दिले. या चर्चेत पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयवंतराव आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, राज्य अभ्यास समितीचे विश्वनाथ पाटोळे, मुंबई विभागाचे सदस्य श्री. वाबळे यांनी सहभाग घेतला.