*कोकण Express*
*भारतीय तरुणांच्या कौशल्य विकासासाठी जर्मनी करणार साहाय्य : मंत्री दिपक केसरकर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
शालेय शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर, त्यांच्या समवेत असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी आणि मंगळवारी तीन महत्त्वाच्या बैठका झाल्या. स्टुटगार्ट व कार्ल्सरूह येथे झालेल्या या बैठकांना भारताचे महावाणिज्य दूत (दक्षिण जर्मनी) मोहित यादव, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण खात्याचे प्रधान सचिव श्री. रणजितसिंह देओल व श्री. केसरकर यांचे स्वीय सचिव श्री. मंगेश शिंदे उपस्थित होते. या महत्वाच्या बैठकांचे नियोजन जर्मनीतील मराठी उद्योजक श्री. ओंकार कलवडे यांनी केले.
स्टुटगार्टमध्ये श्री. केसरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची बाडेन-बूटेमबर्ग राज्य सरकारशी बैठक झाली. त्यास स्टेट मिनिस्टर डॉ. फ्लोरियान स्टेकमन, राज्याच्या शिक्षणमंत्री थेरेसा शॉपर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यात अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन धोरणांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये तातडीने कृतिदल सुरु करुन कौशल्यविकास, पर्यटन, शिक्षण, सांस्कृतिक देवाण-घेवाण याबाबतचे सामंजस्य करार केला जाईल.