*कोकण Express*
*आरोंदा येथील मच्छीमार बांधवांच्या समस्या जाणून घेऊन मार्गी लावण्यासाठी*
*ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या टीमची आरोंदा येथे भेट*
*कासार्डे; संजय भोसले*
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने आरोंदा येथील मच्छीमार बांधवांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या मार्गी लावण्यासाठी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक आणि त्यांची संघटनेची टीम उपस्थित होती. यावेळी मच्छीमार बांधव व ग्रामस्थांची बैठक पार पडली.मच्छीमार बांधवांनी आपल्या समस्या संतोष नाईक यांच्यासमोर मांडल्या व ह्युमन राईट संघटनेच्या वतीने न्याय मिळवून देण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले.
गेले वीस वर्षे तेथील मच्छिमार बांधव हे आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांना त्यांचे हक्क मिळत नव्हते.
मच्छीमार बांधवांनी दिलेल्या लेखी निवेदनात महत्त्वाच्या समस्या मांडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणच्या असलेल्या स्थानिक रहिवाशांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे मच्छीमारी, परंतु मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रेती उत्खनामुळे त्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन झाल्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या घरामध्ये पाणी घुसण्याचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच या मच्छीमार बांधवांना वाळू माफियांचा मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना आपले जीवन भीतीच्या छायेखाली जगावे लागत आहे. तसेच आरोंदा गाव नकाशामध्ये तीन बेटे ही खाडीमध्ये अस्तित्वात होती. परंतु मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन झाल्यामुळे कांदळवन नष्ट झाल्यामुळे तीन बेटांपैकी दोन बेटे ही समुद्राने गिळंकृत केली आहेत. आता फक्त एकच बेट शिल्लक राहिले आहे. सरकार दरबारी त्यांना कुठलीही मदत मिळत नाही. तसेच गोवा राज्य जवळ असल्यामुळे तेथील मुले, मुली मोठ्या प्रमाणात गोवा राज्यामध्ये नोकरीसाठी ये जा करत असतात परंतु वाळू माफिया त्या मुलांना धमकावत असतात असे बरेच प्रकार त्या मच्छिमार बांधवां सोबत वारंवार घडत आहेत. या सगळ्या समस्यांचे योग्य मार्गाने निराकरण व्हावे आणि प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात यासाठी याबाबतचे लेखी निवेदन यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेला देण्यात आले.त्यानंतर प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करण्यात आली.
मच्छीमार बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष- संतोष नाईक, जिल्हा सचिव- अर्जुन परब, सावंतवाडी तालुका सचिव- ॲड.संदीप चांदेकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष- सोहम शारबिंद्रे, मालवण तालुका जनसंपर्क अधिकारी रोहित हडकर तसेच पत्रकार दीपक तारी उपस्थित होते.
निवेदन देते वेळी आरोंदा सरपंच सौ.गीता तारी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष गोकुळ मोरे, सचिव शंकर पेडणेकर, उपाध्यक्ष नयन चोडणेकर,भाई वेळणेकर, सुनील वेळणेकर, तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिलांचा समावेश होता.