*कोकण Express*
*”स्वतः मधून रुग्णाला समजून घेणे म्हणजे परिचर्या “- सौ.रत्ना देवरे*
“रुग्णसेवा देताना स्वतःला त्या ठिकाणी ठेवून विचार करा तरच आपण परिचारिका म्हणून योग्य सेवा रुग्णाला देऊ शकतो. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या समस्या स्वतःच्या म्हणून समजावून घेतल्या तर त्या जास्त योग्य रीतीने सोडविल्या जातील” .असे मत महाराष्ट्र राज्य विद्यार्थी परिचर्या परिषद सल्लागार सौ.रत्ना देवरे यांनी व्यक्त केले. बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजमध्ये आयोजित बी.एस.सी नर्सिंग प्रथम सत्रातील मुलांच्या शपथ ग्रहण समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावरून त्या बोलत होत्या. आपल्या पुढील मनोगतामध्ये त्यांनी “आपण ज्या व्यवसायात कार्यरत असतो त्या व्यवसायाची शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे; तरच त्याचा दर्जा वाढू शकतो आणि ती व्यक्ती आपला वैयक्तिक विकास करू शकते .एक परिचारिका म्हणून चांगले श्रोते व्हा, कारण रुग्णांच्या निम्म्यापेक्षा जास्त समस्या जेव्हा आपण योग्य रीतीने ऐकून घेतो तेव्हाच त्या सुटलेल्या असतात ,असेही त्या पुढील आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, बॅ. नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन श्री. उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै सीनियर कॉलेज प्राचार्य श्री .अरुण मर्गज, बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ. मीना जोशी, उपप्राचार्य सौ. कल्पना भंडारी उपस्थित होत्या.
दीपप्रज्ज्वलन व फ्लोरेन्स नाईंटींगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरू झालेल्या या कार्यक्रमांमध्ये अतिरिक्त जिल्हा अधिकारी डॉक्टर संदेश कांबळे अध्यक्ष म्हणून लाभले .”परिचर्या क्षेत्रामध्ये शपथविधी समारंभ हा एक खरोखरच सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा कार्यक्रम आहे, यातूनच सकारात्मकता मिळवून तुमचे उज्ज्वल भविष्य घडवा.स्वतःला जपाच ;पण त्यासोबत इतरांची सुद्धा तेवढ्याच आत्मियतेने काळजी घ्या .वैयक्तिक विकासासाठी वाचनाची सवय ठेवा ,शैक्षणिक पुस्तकांसोबतच अवांतर वाचनाची आवड जोपासा, कारण शिक्षण हे माणसाला वैयक्तिक स्वातंत्रता आणि स्वायत्तता प्रदान करते .”असे उद्गार डॉक्टर संदेश कांबळे यांनी काढले ते या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष माननीय श्री. उमेश गाळवणकर यांनी विद्यार्थी- विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या .
“परमेश्वराच्या सेवेपेक्षा मनुष्य सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे . आणि हे पुण्य फक्त परिचर्या या क्षेत्रात मिळते असे,” उद्गार बॅ. नाथ पै महिला व रात्र कॉलेजचे प्राचार्य श्री . अरुण मर्गज यांनी काढले.
“शपथविधी हा कार्यक्रम म्हणजे या क्षेत्राशी वचनबद्ध होणे आणि परिचर्या क्षेत्राशी वचनबद्ध होत असताना दिव्याच्या रूपाने हा वसा विद्यार्थी -विद्यार्थिनींना दिला जातो. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. रत्ना देवरे व नर्सिंग कॉलेज प्राचार्या सौ.मीना जोशी यांनी हा दिव्याच्या रूपाने वसा नर्सिंग कॉलेजच्या प्रा. सौ. सुमन सावंत व पूजा म्हालटकर यांना दिला व यांनी या नवीन विद्यार्थी -विद्यार्थिनी पर्यंत पोहोचविला. यावेळी नर्सिंग कॉलेज उपप्राचार्य सौ.कल्पना भंडारी यांनी या नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी -विद्यार्थ्यांना शपथ दिली ,
या कार्यक्रमाची प्रस्तावना नर्सिंग कॉलेज प्रा.वैशाली ओटावणेकर यांनी केली तर वार्षिक अहवाल वाचन प्राचार्य सौ.मीना जोशी यांनी केले .तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रणाली मयेकर व गौतमी माईंनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुमन करांगळे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला प्रा.शांभवी आजगावकर, कृतिका यादव ,ऋग्वेदा राऊळ, प्रा.प्रथमेश हरमलकर ,प्रसाद कानडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .