*कोकण Express*
*शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन फिरणारे चौघे अटक:कडावल बाजारपेठ आज सकाळी साडे पाच वाजण्याची घटना*
*एलसीबीची धडक कारवाई ; कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन फिरणाऱ्या कुडाळ येथील चौघांना आज स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने कडावल बाजारपेठेत ताब्यात घेतले. ही कारवाई आज सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. त्यांच्याकडून दोन बंदुकांसह तेरा जिवंत काडतूसे, एक कार आणि एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अजित लाडोबा तांबे (वय- ५५ वर्षे, रा. वक्रतुंड कॉम्पेक्स, कुडाळ ), दत्ताराम संभाजी परब (वय- ५० वर्षे, रा. वक्रतुंड संकुल, लक्षीवाडी, कुडाळ), सिध्देश सुरेश गावडे (वय- २४ वर्षे, रा. अणसुर, टेंबवाडी, वेंगुर्ला), नारायण प्रकाश राउळ, (वय-१९ वर्षे, रा. तेंडोली, खरातवाडी, कुडाळ) अशी त्यांची नावे आहेत. यातील चौघेही संशय पांग्रड येथील जंगलात शिकारीच्या उद्देशाने गेले होते. याबाबतची माहिती अज्ञातांकडून मिळाल्यानंतर गुन्हा शाखेच्या वतीने सापळा रचण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक महिंद्र घाग, गुरुनाथ कोयंडे, हवालदार प्रकाश कदम, अनुप कुमार खंडे, प्रमोद काळसेकर, प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी सापळा रचत कडावल बाजारपेठेत सकाळी ही कारवाई केली. त्यांच्याकडून दोन बंदुकांसह तेरा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.