*कोकण Express*
*कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी कोकणातील हजारो शेतकरी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता काढणार ट्रॅक्टर मोर्चा*
▪️केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला काॅग्रेसची नाहक आडकाठी
*कणकवली ः प्रतिनिधी*
अमेठीतून लढणारे राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवतात मग कोकणातील आंबा काजूला मध्यप्रदेश गुजरात सह संपूर्ण देशातील बाजारपेठ खुली करून देणारे मोदी सरकारचे कृषीविधेयक का नको ? असं थेट सवाल करत भाजपा आमदार नितेश राणें यांनी कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी कोकणातील हजारो शेतकरी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला सर्वाधिक विरोध करत नाहक गैरसमज राष्ट्रीय काँग्रेसने पसरवले आहेत. राष्ट्रीय काँग्रेसच्या सत्ताकाळातील हे कृषी विधेयक असून मोदी सरकारने ते अस्तित्वात आणले. राष्ट्रीय काँग्रेसच्या जाहीरनाम्यात या कृषी विधेयकाचा उल्लेख होता. त्यामुळे व्हिधेयकाला विरोध ही राष्ट्रीय काँग्रेसची नौटंकी असल्याचा हल्लाबोल आमदार नितेश यांनी केला. सिंधुदुर्गातील सर्वसामान्य शेतकरी, उसउत्पादक शेतकरी, काजू आंबा बागायतदार शेतकऱ्यांना कृषी विधेयकाचा विशेष लाभ होणार आहे. कोरोना काळात देवगडमधील आम बिग बाजार, महिंद्रा च्या माध्यमातून विकला गेला. त्याच पद्धतीने भविष्यात शेतकरी आपला कृषीमाल जिथे सर्वाधिक फायदा मिळेल तिथे स्वतः विकू शकेल. मोदी सरकारच्या कृषी विधेयकाचा सर्वाधिक फायदा कोकणातील आंबा – काजू बागायतदारांना होणार आहे. हापुसचा राजा अर्थात देवगडचा हापूस आणि वेंगुर्ले, दोडामार्गच्या काजूला सुद्धा या विधेयकाद्वारे देशभराची बाजारपेठ खुली होणार आहे. त्यामुळेच कोकणातून या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठीच हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ७ जानेवारी रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केल्याची माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. हा ट्रॅक्टरमोर्चा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ अनिल भोंडे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली मुंडे डोंगरी येथून सुरू होऊन कणकवली प्रांताधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर या मोर्चाचे भाजपा कणकवली कार्यालयनजीक सभेत रूपांतर होणार आहे. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मोदी सरकारच्या कृषी विधेयकाचा जयजयकार करणारा कोकणातील शेतकाऱ्यांचा आवाज या मोर्चातून कणकवलीतून थेट दिल्लीदरबारी पोचणार आहे. या ट्रॅक्टर मोर्चात कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील दहा हजार शेतकरी आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित राहतील असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.