*कोकण Express*
*आडाळी एमआयडीसीच्या प्लॉट वाटपात शंभर कोटीचा गैरव्यवहार…?
*ग्रामस्थांचा आरोप; तात्काळ प्रकार थांबवा अन्यथा संघर्ष, एकनाथ नाडकर्णी….*
*दोडामार्ग ःःप्रतिनिधी*
स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी आडाळीत एमआयडीसी मंजूर करून घेण्यात आली. परंतु उद्योजकांना प्लॉट
द्यायचे सोडून अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार सुरू आहेत. हा आकडा शंभर कोटीच्या घरात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांचा आहे.
त्यामुळे हा प्रकार तात्काळ थांबवा, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ
नाडकर्णी यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद केले आहे की, दहा वर्षांपूर्वी मी स्वतः पुढाकार घेउन नारायण राणे यांच्याकडून आडाळीत प्रकल्प मंजूर करून घेतला. तालुक्यातील जनतेला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हा प्रकल्प आणला. मात्र आज दहा वर्षे झाली तरी प्रकल्पाचे काम पुर्ण करता आले नाही. स्थानिकांनी कुठलाही विरोध न करता आपल्या जमिनी दिल्या. कोकणातील अनेक प्रकल्पना स्थानिकांनी विरोध केल्याने प्रकल्प रखडले. अशावेळी आडाळीच्या ग्रामस्थानी जे योगदान दिले त्याचा सन्मान शासनाने ठेवायला हवा. पण आज महामंडळ आणि शासन शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे. मधल्या काळात आमच्याकडे सत्ता नव्हती. सत्ता आल्यावर प्रकल्पाला गती मिळेल असं वाटतं होत. पण उद्योग मंत्रालय उदय सामंत यांच्याकडे येऊन आठ महिने झाले, मात्र फारसा काही फरक पडताना दिसत नाही हे दुर्दैव आहे. उलट मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळमुळे आडाळीच महत्व वाढल्याने आता महामंडळाच्या अधिकान्यांनी नको तेच उद्योग सुरु केल्याचे दिसत आहे.. येथील उद्योगासाठीच्या जमिनीचे आरक्षण उठवून, महसूलच्या अधिकाऱ्यांनाकडून सातबारावरती चुकीच्या नोंदी घालून बनावट कागदपत्रे बनवून कोट्यावधीचा गैरव्यावहार करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. अर्थात ग्रामस्थ जागृत आहेत. त्यांनी प्रकल्पासाठी त्याग केला आहे. त्यामुळे यापुढे महामंडळाचे अधिकारी व गैरव्यावहारात गुंतलेल्याना न्यागाची ताकद काय असते ते दाखवून देऊ. शेतकऱ्यांसाठी प्रसंगी राजकीय किंमत मोजायला माझी तयारी आहे. आज अनेक उद्योजक आडाळीत यायला तयार आहेत. त्यांना भूखंड देण्यासाठी शासन व महामंडळ तयार नाही, मात्र जमिनी विकून मलिदा लाटायचे धंदे उघडले आहेत. आता अधिकाऱ्यांनीही शिस्तीत राहावे, जनहितासाठी पक्षाच्या वरिष्ठाकडे तक्रार करण्यात येईल, अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष करु, पण अशा गैरव्यावहाराला थारा देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.