*कोकण Express*
*कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न.!*
*दापोली :-*
कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान मार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार- कृष्णामामा यांनी स्मृती पुरस्कार दापोली तालुक्यातील ज्येष्ठ वारकरी महाराज- पांडुरंग बाबा रेवाळे यांना प्रदान करण्यात आला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे थेट १० वे वंशज ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे आणि विधान परिषद आमदार मा.श्रीकांत भारतीय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.*
कार्यक्रमाची सुरुवात करताना, केळसकर नाका येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महराजांच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन वारकरी दिंडी आणि मिरवणूक सुरु करण्यात आली. ही दिंडी अत्यंत उत्साहात, केळसकर नाका ते ए जी हायस्कूल येथे रवाना झाली.
मा.पांडुरंग बाबा रेवाळे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य वारकरी बांधव या दिंडी मध्ये सहभागी झाले होते. दिंडी सभागृहात येताच कार्यक्रमची सुरुवात भारतमाता पूजन करुन झाली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन दादा पाटणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले, प्रास्ताविक गंगाराम ईदाते यांनी केले, सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी केले.
सत्कारमूर्ती रेवाळे महाराज यांनी त्यांच्या मनोगता दरम्यान म्हंटले की या पुरस्कारामुळे तालुक्यातील वारकरी संप्रदायात नवीन चैतन्य निर्माण होते आहे. कार्यक्रमाचे अतिथी ह.भ.प शिवाजी महाराज मोरे यांनी म्हंटले कृष्णामामा महाजन यांच्या रूपाने एक संघाच्या संस्काराने घडलेला समर्पित शिक्षणमहर्षी या तालुक्याला मिळालाच पण त्यांच्या शाळेतून घडलेले अनेक रत्न आज पुढे ते संस्कार प्रसारित करण्याचे काम करत आहेत.
कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षीय भाषणाने करताना आ.श्रीकांतजी भारतीय यांनी कोकणात इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्याबाबत रेवाळे बाबांचे अभिनंदन केले. श्रीकांत भारतीय म्हणाले, आपल्यापैकी सर्वच जण कृष्णामामांच्या उंचीचे कार्य करू शकणार नाहीत पण किमान त्यांच्या कर्तृत्वाचा एक कण, जीवनाचा एक क्षण जरी आपण घेऊ शकलो तरी आजचा पुरस्कार सोहळा यशस्वी झाला असे आपण म्हणू शकतो. कार्यक्रमाची सांगता वीणा महाजन यांनी संस्कृत पसायदान सादर करुन केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानच्या संपूर्ण युवा टीमने प्रयत्न केले.