*कोकण Express*
*भाजपच्या माध्यमातून योजना यशस्वी पद्धतीने राबविल्यास एकही घर उपाशी राहणार नाही…*
*तळागाळात योजना पोचण्यासाठी जनतेने पुढाकार घेतला पाहिजे : राजन तेली…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
भाजपाच्या माध्यमातून केंद्रात आणि राज्यात राबविण्यात आलेल्या योजना यशस्वी पध्दतीने राबविल्यास एकही घर उपाशी राहणार नाही, किंवा एकही रुग्ण उपचारा शिवाय दगावणार नाही. मात्र या योजना तळागाळात पोचण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज कोलगाव येथे केले. दरम्यान आयत्यावेळी कोण समज-गैरसमज करुन बुध्दीभेद करत असेल, तर त्यांच्या पाठीशी राहण्यापेक्षा एरव्ही तुमच्या संकटात आणि सुखदु:खात कोण धावले त्याला निवडणुकीत सहकार्य करा, मागच्यावेळी अवघ्या काही मतांनी महेश सारंग यांचा पराभव झाला, ही चूक पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्या, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजपाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या महाविजय यात्रेचा शुभारंभ आज कोलगाव येथून करण्यात आला. यावेळी श्री. तेली बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष रविंद्र मडगावकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, उपसरपंच दिनेश सारंग, प्रमोद गावडे, चंद्रकांत जाधव, अब्दुल साठी, रोहित नाईक, संदीप हळदणकर, आत्माराम चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. तेली म्हणाले, भाजपाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर महाविजय यात्रेची आज कोलगाव पासून सुरूवात करण्यात आली आहे. या माध्यमातून शासनाकडुन राबविण्यात येणार्या योजना जास्तीत-जास्त लोकापर्यत पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. आता काही दिवसांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका येणार आहेत. या निवडणूकांमध्ये भाजपच्या चिन्हावर असलेल्या व्यक्तीला आपले अमुल्य मत देवून संबधित उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन करीत मागच्यावेळी अवघ्या काही मतांनी महेश सारंग यांना आपला पराभव पत्करावा लागला. परंतू याची पुनरावृत्ती होणार नाही व, यासाठी सर्वानी दक्षता घेणे गरजेचे आहे. श्री. सारंग हे कट्टर कार्यकर्ता आहेत. त्याच बरोबर चांगले समाजसेवक आहेत. आपल्या गावाचा मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी त्यांचे कायम प्रयत्न असतात. त्यामुळे अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी येणार्या काळात कोलगावातील जनतेने ठाम पणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्री. सारंग यांनी आपले विचार मांडले या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी गावाच्या विकासासाठी आला आहे. पाणी पुरवठा योजनेसह साकव रस्त्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे आता येथील जनतेने भाजपा सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी संजू परब, रवी मडगावकर यांनी आपले विचार मांडले.

