*कोकण Express*
*कोरोना काळात कणकवली मधील स्वॅब कलेक्शन सेंटरच बंद…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
स्लॅब कलेक्शन करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मुदतवाढ न दिल्यामुळे कणकवली येथील स्वॅब कलेक्शन सेंटर १ जानेवारी २०२० पासून बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. ऐन कोरोना काळातच आणि कोव्हीड स्टेन सारख्या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव जाणवू लागल्यानंतर कणकवली येथील स्वॅब कलेक्शन सेंटर बंद ठेवण्यातून जिल्हा प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला कोव्हीड रुग्ण कणकवली तालुक्यात सापडला. जिल्ह्यात सर्वाधिक कोव्हीड रुग्ण हे कणकवली तालुक्यात आढळले आहेत. मे २०२० पासून कणकवली उपजिल्हा रुग्णालयांतर्गत पिडब्ल्यूडी रेस्ट हाऊस येथे स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आले होते. कणकवली येथील स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट साठी स्वॅब कलेक्शन केले जाते. दररोज सरासरी ४० स्वॅब कलेक्शन केले जात होते.
या सेंटरमुळे कणकवली शहर आणि तालुक्यासह लगतच्या देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील नागरिकांनाही स्वॅब देणे सोयीस्कर होते. या स्वॅब कलेक्शन सेंटर साठी कंत्राटी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला होता. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती मुदत ३१ डिसेंबर २०२० रोजी समाप्त होत असल्याचे उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले. मात्र तरीही त्या कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून मुदतवाढ न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांअभावी कणकवलीतील स्वॅब कलेक्शन सेंटर १ जानेवारी २०२० पासून बंद ठेवण्यात आले आहे.