*कोकण Express*
*“या” अटीवर वैभव नाईक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास होते तयार…..*
*भाजपा नेते निलेश राणेंचा दावा ; आरोप खोटा असेल तर कोणत्याही देवाला हात लावून नकार देण्याचं आव्हान
*वैभव नाईक यांनी आजवर उद्धव ठाकरेंशी खोटं बोलून जिल्ह्यातील शिवसेनेची मलई खाल्ल्याचीही टीका*
*मालवण ः प्रतिनिधी*
आमच्या पक्षात आला नाही तर जेलमध्ये टाकीन, अशी धमकी बड्या नेत्याकडून आपल्याला मिळाली होती, असा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. यावरून भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी आ. नाईक यांचा समाचार घेतला आहे. वैभव नाईक कितीवेळा आणि कसे कसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले, पक्षात येण्याचे सांगून आपली किती कामे करून घेतली हे सर्वांना माहित आहे. राणेना विचारा कुडाळ मालवण मधून लढाणार की नाही. आणि मला कुडाळ मालवण मधून उमेदवारीची खात्री द्या, मी १०० % शिवसेनेत येतो, असं वैभव नाईक यांनी शिंदे साहेबांना म्हटलं होतं. वैभव नाईक याला उद्धव ठाकरे यांच्याशी काही देणंघेणं नाही. त्याला फक्त स्वतःची आमदारकी हवी आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. माझा आरोप खोटा असेल तर वैभव नाईक याने सांगेल त्या मंदिरात देवाला हात लावून सांगावं, असं आव्हान देखील निलेश राणे यांनी दिले आहे.
भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विटर वरून व्हिडीओ पोस्ट करीत वैभव नाईक यांचा समाचार घेतला आहे. वैभव नाईक सातत्याने मी उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत आहे, त्यांची साथ कधी सोडणार नाही. अशा बोगस वार्ता करीत आहेत. खर तर निष्ठेचा आणि वैभव नाईक यांचा दूर दूर हूनही संबंध नाही. वैभव नाईक यांच्या घरची लोकं देखील त्याच्या निष्ठेचा दाखला देणार नाहीत. हा कोणाशी तरी निष्ठावंत आहे हे त्यांना पण माहित नाही. असं असताना सातत्याने त्याचं मी पक्ष सोडणार नाही, असं स्टेटमेंट देण सुरु आहे.