*कोकण Express*
*वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत नागरी बँकांचा समावेश करावा : प्रवीण काकडे*
*कासार्डे ; संजय भोसले*
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज योजना व्याज परतावा योजना विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सुरू आहे. मात्र, त्यासाठी राष्ट्रीयकृत बन्केची अट असून त्यामध्ये नागरी बँकाचाही समावेश करावा, अशी मागणी पत्रकाद्वारे ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व स्वराज्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य प्रवीण काकडे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
या महामंडळाकडून विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँकेकडूनच कर्ज घेणे आवश्यक आहे व राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले तरच त्या व्याज परताव्या योजनेचा फायदा उद्योजक किंवा नागरिकांना होतो. परंतु राष्ट्रीयकृत बँकेकडून बेरोजगार युवक यांची कर्ज प्रकरणे जाणून बुजून मंजूर केली जात नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व सुशिक्षित बेरोजगार यांना या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
विविध जाती जमातीतील समाजबांधव यांचेसाठी प्रत्येक जातीनुसार महामंडळे निर्माण करुन त्यांचा विकास करणेसाठी निर्माण केली आहेत. परंतु खर्या अर्थाने जेवढी आश्वासने दिली आहेत, तेवढी कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येत नाहीत. व अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे बेरोजगार युवकांचे प्रमाण वाढत असल्यामुळे नोकरीचा प्रश्न युवकांच्या पुढे गंभीर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ज्या काही विविध जाती जमातीतील युवा उद्योजकांच्या बाबतीमध्ये ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या योजनेच्याबाबत राष्ट्रीय बँकांमध्ये अडवणूक केली जाते त्यामुळे नागरी सहकारी बँकांचा समावेश करून नवउद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी संधी निर्माण करुन द्यावी.
अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची व्याज परतावा योजना जसे राष्ट्रीयकृत बँक बरोबर व इतर बँकेलासुद्धा लागू आहे. त्याच धर्तीवर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजना राष्ट्रीय कृत बँकेसोबत व इतर बँकांना सुद्धा ही योजना लागू करण्यात यावी अशी मागणी पत्रकाद्वारे प्रवीण काकडे यांनी केली आहे.