*कोकण Express*
*दिगंबर गणू गांवकरांच्या “गाऱ्हाणा”चा देवगडात दिमाखदार प्रकाशन सोहोळा संपन्न…*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड गिरये -बांदेवाडी येथील प्रतिथयश सुप्रसिध्द लेखक,कादंबरीकार,नाट्य लेखक,आणि एकांकिका लेखक श्री दिगंबर गणू गांवकर यांच्या ” गाऱ्हाणा”या मालवणी काव्य संग्रहाचे प्रकाशन नुकतेच कै. मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन येथे दिमाखात पार पडले.
यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत महासंघाचे अध्यक्ष व माजी आमदार श्री.परशुराम उपरकर,श्रीराम विद्यामंदिर पडेलचे मुख्याध्यापक श्री.हिराचंद तानावडे सर,गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष आणि मालवणी लेखक श्री.चंद्रशेखर उपरकर,देवगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती.साक्षी प्रभू,डॉ.पोकळे,श्री. लक्ष्मण गांवकर,श्री.प्रभाकर गांवकर,तसेच दिगंबर गांवकर यांच्या पत्नी सौ.वृषाली गांवकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार उपरकर यांनी श्री.दिगंबर गावकर यांच्या कविता संग्रहाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.श्री.तानावडेसर म्हणाले की,बांदेवाडी गावात सुमारे 6 दर्जेदार साहित्यिक आहेत त्यापैकी दिगंबर गांवकर हे चतुरस्त्र लेखणी लाभलेले साहित्यिक आहेत.आणि असे हुशार विद्यार्थी आमच्या प्रशालेचे आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो.गाऱ्हाणं या कविता संग्रहातील अनेक कविता मनातल्या प्रत्येक गाऱ्हाण्याची आठवण करून देतात.यावेळी मालवणी लेखक श्री.चंद्रशेखर उपरकर यांचेही समयोचीत भाषण झाले.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर देवाजवळ गाऱ्हाणं घालताना ठेवतात तशी आंब्याची 5 पाने आणि नारळाचे छायाचित्र छापून काव्य संग्रहाची महती अधोरेखित केली आहे.
श्री.दिगंबर गांवकर यांची “इपळाक”ही कादंबरी गाजलेली असून तिला महाराष्ट्र कामगार कल्याण मांडळाचा प्रथम पुरस्कार लाभला आहे.त्यांच्या “वकाद”व “अमुक्ती “या कथा संग्रहाना कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार मिळाले आहेत.त्यांचे “भस्मासुराचा वध” हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यात आले होते.याशिवाय त्यांच्या दर्यावर्दी,माझी सहेली,दैवज्ञ अशा कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.शिवाय त्यांनी विविध पत्रातून सुद्धा लेखन केले आहे.या व्यतिरिक्त श्री.गावकर यांनी 2002 ते 2004पर्यंत केंद्रीय सेन्सॉर बोर्डावर चित्रपट परीक्षक म्हणूनही काम केले आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.राकेश गांवकर यांनी केले. यावेळी महाराष्ट्र गाबित् संस्थेचे अध्यक्ष श्री.सुजय धूरत,कवी शामसुंदर गावकर,राजेंद्र राजम,लक्ष्मण तारी,गणपत बांदकर,अनंत माळगावकर,पांडुरंग म्हादनाक,मंदार कोयंडे,संदीप डोळकर,संजय बांदेकर वगैरे प्रतिष्ठित नागरिक आणि साहित्य शेत्राची आवड असलेले नागरिक उपस्थित होते.