*कोकण Express*
*सिंधुरत्न समृध्द योजनेतून क्रांती घडविणार : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर*
*सिंधुदुर्ग*
जिल्ह्यात सिंधुरत्न समृध्द योजनेतून क्रांती घडविली जाणार असल्याचं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुरत्न समृध्द योजना मुख्यालयाच्या आजच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, माजी आमदार प्रमोद जठार, योजनेचे उपाध्यक्ष एम. देवेंद्र सिंह, सदस्य कीर्ती किरण कुमार, सदस्य सचिव दिलीप पवार, सदस्य सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर म्हणाले, अर्थसंकल्पातूनच कोकणच्या विकासासाठी नवी मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.कोकणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून कोकणात विकासाला चालना नक्कीच मिळेल. सिंधूरत्न योजनेद्वारे कोकणातील बागायतदार शेतकरी, बचतगटांच्या महिलांसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेतूनच जिल्ह्यातील महिला सक्षम होण्यासाठी मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात काजू पीक मोठ्या प्रमाणात होत आहे. या पिकावरील पूरक उद्योगधंद्यांना सुद्धा चालना देण्यात येईल. म्हणजेच जिल्ह्यात नवी काजू क्रांती होईल. फणस आणि आंबा या पिकांसाठी सुद्धा नवीन प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात येईल.जवळपास कोकणासाठी साडे तेराशे कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली असून काजू बोर्ड स्थापनेसाठी २०० कोटीची तरतूद केली आहे. मच्छीमारांसाठी सुद्धा विशेष निधी देण्यात आला आहे.
पर्यटनदृष्ट्या जिल्हा अजून सक्षम होण्यासाठी नवे नवे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकार सुद्धा सक्षम असल्याचे ते म्हणाले. कोकणासाठी वेगळा मास्टर प्लॅन बनवण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यासाठी एकमत आहे. जवळच्या गोवा राज्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यामुळे याचा फायदा कोकणातील मत्स्य व्यवसाय, आंबा-फणस यांची निर्यात तसेच पर्यटन क्षेत्राला होईल. यासाठी आपण पुढाकार घेत आहे. व्यवसायावर निगडित होलसेल मार्केट सुद्धा जिल्ह्यात उभारणीसाठी प्रयत्न करणार असून, यासाठी सिंधूरत्न योजनेचा सुद्धा फायदा होईल. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रसिद्ध आर्किटेक्ट जिल्ह्यासाठी मास्टर प्लॅन तयार करत असून, यामुळे कोकणातील आणि विशेष करून जिल्ह्यातील विकासाला चालना मिळेल.
पर्यटनाला चालना देण्यासाठी गोल्फ सेंटर जिल्ह्यात विकसित करण्यात येणार असून महिला बचतगटांसाठी सुद्धा अनेक नव्या योजना जिल्ह्यात दाखल होणार आहेत, असेही ते म्हणाले.