*कोकण Express*
*वसंतदादा पाटील यांच्या नंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम तेच कायम मुख्यमंत्री असतील-ब्रिगेडियर सुधीर सावंत*
वसंतदादा पाटील यांच्या नंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून चांगले काम आहे. त्यामुळे तेच कायम मुख्यमंत्री असतील. त्यांना कोणी हटवू शकत नाहीत असे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करत आहेत. त्यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांना कोणीही हटवू शकत नाही. २०२४ ला निवडणुकीत पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून जनता स्विकारेल, असा दावा शिवसेना नेते ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी आज येथे केला.
दरम्यान राष्ट्रवादी सोबत गेलात तर शिवसेनेला शरद पवार संपविणार असा मला संशय आला होता. त्यामुळे याबाबत आपण खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंना फोन करुन कल्पना दिली होती. तो फोन मिलिंद नार्वेकर यांनी उचलला होता.परंतू मला काही प्रतिसाद दिला नाही आणि शिवसेना फुटली माझं भाकित खरं ठरलं , असेही ते म्हणाले. श्री. सावंत यांनी मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
या प्रसंंगी जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुकाध्यक्ष नारायण राणे, योगेश तुळसकर, कीसन मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर श्री. शिंदे यांनी चांगले काम केले आहे. अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या बद्दल जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. वसंतदादा पाटील यांच्या नंतर चांगला मुख्यमंत्री म्हणून आता त्यांच्याकडे पाहीजे जात आहे. तर दुसरीकडे न्यायालयाचा निकाल सुध्दा आता शिंदे गटाच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे आता आम्हीच खरे शिवसैनिक आहोत, असा दावा करुन काही झाल तरी शिंदेंना कोणी मुख्यमंत्रीपदावरुन हटवू शकत नाही. तर पुढच्या निवडणूकीनंतर सुध्दा तेच मुख्यमंत्री असणार आहेत.
श्री. सावंत पुढे म्हणाले, या ठीकाणी शिवसेना म्हणून अधिकृत नाव आणि पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर अनेक शिवसैनिक तसेच अन्य पक्षातील लोकांनी पक्षात प्रवेश करण्यास सुरवात केली आहे. काल नारुर-हीर्लोक येथे मोठे प्रवेश झाले. आता जिल्ह्यात अन्य ठीकाणी सुध्दा मोठया प्रमाणात शिवसैनिक या ठीकाणी येणार आहेत. त्यामुळे भविष्यात सिंधुदूर्गात पक्ष संघटना बळकट झालेली दिसेल. तर अनेक लोक आता शिवसेनेत येतील .
मी सैन्यात व राजकीय जीवनात दहशतवाद खपवून घेतला नाही. त्याविरोधात लढलो. यापुढेही लढत राहीन. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दहशतवाद अजून संपलेला नाही. आपण कालही दशहतवादाच्या विरोधात होतो आणि यानंतरची लढाई सुध्दा आपली त्याच पध्दतीने असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.