*कोकण Express*
*कणकवलीत क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला भाजपा – ठाकरे गट – शिंदे गट एकाच व्यासपीठावर*
*नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाले क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन*
*गांगेश्वर व सुजित जाधव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीतील गांगेश्वर मित्र मंडळ व सुजित जाधव मित्र मंडळ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रणजीत स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे गंगेश्वर मित्र मंडळ सोबतच ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख असलेले, सुजित जाधव मित्रमंडळ मार्फत आयोजित असलेल्या या स्पर्धेला भाजपा, शिंदे व ठाकरे गट या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर आल्याने या स्पर्धेच्या उद्घाटनापेक्षा या उद्घाटनासाठी व्यासपीठावर एकत्र आलेल्या पक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीची चर्चा मात्र कणकवली जोरदार रंगली आहे. कारण येत्या काही महिन्यांमध्येच कणकवली नगरपंचायत ची निवडणूक होऊ घातली असल्याने यातील काहींची इच्छुकांमध्ये नावे देखील चर्चेत आहेत. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज करण्यात आले. या उद्घाटनाच्या निमित्ताने शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपाचे नगरसेवक शिशीर परुळेकर, कलमठ ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग, चानी जाधव, राजा पाटकर, यांच्यासह अन्य उपस्थित होते. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी या उद्घाटन प्रसंगी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल दोन्ही मित्र मंडळाचे कौतुक करत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.