*कोकण Express*
*“रन फॉर हेल्थ” चा संदेश देत मालवणात पार पडली जिल्ह्यातील पहिली महिला मिनी मॅरेथॉन ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*मालवण ः प्रतिनिधी*
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्या वतीने आयोजित आणि हॉटेल मालवणी व मंगलमूर्ती स्कुबा डायविंग मालवण यांच्यातर्फे पुरस्कृत करण्यात आलेल्या जिल्ह्यातील पहिल्या महिलांच्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘रन फॉर हेल्थ’ हा संदेश घेऊन धावणाऱ्या सर्व गटातील स्पर्धकांनी २ कि.मी.चे अंतर पार केले. या स्पर्धेत १६ ते ३० वयोगटात दिव्या संजय मंडलिक, ३१ ते ४५ वयोगटात स्नेहा खवणेकर, यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर ४५ वर्षावरील खुल्या गटाच्या चालण्याच्या स्पर्धेत सौ. अनुष्का नागेश कदम यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
जागतिक महिला दिन निमित्त धूलीवंदन सुट्टीच्या दिवशी सकाळी मालवणात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत तिन्ही वयोगटात एकूण १४२ महिलांनी सहभाग दर्शविला. मालवण देऊळवाडा येथून सागरी महमार्ग ते कोळंब पुल या मार्गावर एकूण २ किलोमीटर अंतरासाठी ही स्पर्धा पार पडली. यामध्ये १६ ते ३० व ३१ ते ४५ या वयोगटासाठी धावणे तर ४५ वर्षावरील खुल्या गटासाठी चालण्याची स्पर्धा घेण्यात आली. देऊळवाडा येथे शिक्षिका सौ. सुविधा तिनईकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचे उद्घाटन झाले