*कोकण Express*
*ज्येष्ठ क्रीडा पत्रकार समलोचक व माजी क्रीडा संपादक वि.वि. करमरकर यांचे निधन..*
मूळचे नाशिकचे असलेल्या करमकरांचे वडील डॉक्टर होते. आपल्या मुलानं सुद्धा डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र, करमकरांनी एमए करत पत्रकारितेची वेगळी वाट निवडली. त्यातही क्रीडा पत्रकारितेत ते रमले. इंग्रजी वर्तमानपत्राप्रमाणे मराठी वर्तमानपत्रातही खेळांच्या जास्तीत जास्त बातम्या असाव्यात असा त्यांचा आग्रह होता. त्याच आग्रहातून मराठी वर्तमानपत्रात खेळ या विषयाला वाहिलेलं स्वतंत्र पान सुरू झालं.
या पानावर त्यांनी देशी-विदेशी खेळांच्या बातम्यांना प्राधान्य दिलं. या प्रयोगाला वाचकांचाही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यामुळे नंतर राज्यात इतर दैनिकांनी सुद्धा एक पूर्ण पान खेळांच्या बातम्यांना देण्याचा निर्णय घेतला. यामुळे खेळांची आवड असणाऱ्या पत्रकारांना यामुळे पूर्ण वेळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या. परिणामी खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक आणि कार्यकर्ते यांच्या सततच्या प्रयत्नांची धडपड ठळकपणे लोकांसमोर आली. या सर्वांचे निर्माते करमरकर असल्याने ते क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले गेले.
समाजवादी चळवळीत सक्रिय असलेल्या करमरकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत पारदर्शक कारभाराचा अट्टहास धरला. नकली आणि संवगतेच्या मागे न जाता जे पायाभूत असेल त्याची कास धरली पाहिजे, यावर त्यांचा कायम भर राहिला. त्यांच्या लिखाणामधून हेच सतत समोर येत राहिले. मुख्य म्हणजे क्रीडा संस्था, कार्यकर्ते आणि खेळाडू यांनी याच वाटेवरून पुढं जायला हवं, कायम टिकू शकेल, याचा त्यांनी सतत ध्यास घेतला. परिणामी राज्यभरात ताकदीच्या क्रीडा संघटना आणि कार्यकर्ते तयार झाले. क्रिकेटसोबत खोखो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे.
पत्रकार फिरता असला पाहिजे!
क्रीडा पत्रकार हा मैदानावर फिरता असला पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असे. सोबतच्या सहकाऱ्यांना ते नेहमी हे सांगत. स्वत: अनेक तास मैदानावर घालवून त्यांनी तो आदर्श घालून दिला होता.
करमरकर यांच्या प्रभावी लिखाणामुळे बुवा साळवी, श्रीपाद हळबे, रवी मांद्रेकर, बाळ वडवलीकर, रमेश वरळीकर, मंगेश भालेकर, भास्कर सावंत अशा असंख्य संघटक आणि कार्यकर्त्यांची महाराष्ट्राला ओळख झाली. यामधून प्रेरणा घेत असंख्य कार्यकर्ते उभे राहिले. खेळांचा प्रचार प्रसार होत राहिला. परिणामी खेळांमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानावर कायम राहिला.
चुकीच्या गोष्टींवर प्रहार
पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलातील भ्रष्टाचाराची करमरकर यांनी पोलखोल केली. त्यातून त्यांना मारहाणही झाली होती. पण यामुळं न डगमगता करमरकर चुकीच्या गोष्टींना झोडपत राहिले. चौकार, षटकार, धावफलक, झटपट क्रिकेट, चौफेर फटकेबाजी, टे टे दापाझो, राकेफ असे अनेक सोपे सुटसुटीत शब्द याची निर्मिती त्यांनी केली. धावत्या समालोचनात सोप्या आणि स्वतः बनवलेल्या शब्दांची पेरणी ते अचूक करीत असत. यामुळं श्रोत्यांना अधिक तपशीलपूर्ण माहिती मिळत असे.