*कोकण Express*
*मोपा विमानतळावर गोव्यासह सिंधुदुर्गातील युवकांना सामावून घ्या…*
*राजन तेली; आयुष हॉस्पिटल तीन महिन्यात सुरू होणार गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा शब्द…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मोपा विमानतळावर भरती करताना पेडण्यासह सावंतवाडी, वेंगुर्ला व बांदा येथील स्थानिक युवकांना प्राधान्य द्या, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. दरम्यान गोवा-बांबुळी येथील हॉस्पिटलमध्ये सिंधुदुर्ग मधील लोकांना प्राधान्याने सेवा दिली जावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी त्या ठिकाणी सेवा देऊच परंतू धारगळ येथे सुरू होत असलेल्या आयुष हॉस्पिटलचा फायदा आता सिंधुदुर्गला मोठ्या प्रमाणात होणार आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे, असे श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले.
श्री. तेली यांनी आज श्री. सावंत यांची भेट घेतली. यावेळी मोपा विमानतळ आता पूर्ण ताकदीनिशी सुरू झाले आहे. भविष्यात या ठिकाणी विदेशी विमान उतरणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार या ठिकाणी लागणार आहेत. यासाठी पेडण्यासह सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला आदी जवळच्या भागातील युवकांचा विचार करण्यात यावा. त्यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याला श्री. सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सद्यस्थितीत बऱ्याचशा युवकांना या ठिकाणी रोजगार देण्यात आला आहे. भविष्यात सुद्धा नव्याने भरती असताना त्या ठिकाणी निश्चित या ठिकाणी विचार करण्यात येईल, असे आश्वासन श्री. सावंत यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर, जिल्हा चिटणीस महेश सारंग, एकनाथ नाडकर्णी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेश धुरी, दोडामार्ग तालुकाअध्यक्ष सुधीर दळवी आदी उपस्थित होते.