*कोकण Express*
*अखंड लोकमंच संस्थेतर्फे कणकवलीत डॉ. आ. ह. साळुंखे व्याख्यान*
*शनिवारी ४ मार्चला नगरवाचनालय सभागृहात कार्यक्रम”
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्रातील थोर विचारवंत, व्याख्याते तसेच प्राकृत, पाली आणि संस्कृत भाषेचे विद्वान, डॉ.आ.ह.साळुंखे यांचे ‘विवेकवादाचा भारतीय वारसा’ याविषयावरील व्याख्यान कणकवली नगरवाचनालयात शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. अखंड लोकमंच संस्थेतर्फे हा कार्यक्रम होणार आहे.
अखंड समाज रचनेच्या निर्मितीसाठी लोकशाहीनिष्ठ मूल्यांचे संवर्धन व्हावे आणि समाजाभिमुख विचारधारा तळागाळात रुजावी यासाठी वैचारिक क्रांतीची मांडणी करणारी ‘अखंड व्याख्यानमाला’ यंदापासून अखंड लोकमंच संस्थेच्यावतीने सुरू होत आहे. यात ‘विवेकवादाचा भारतीय वारसा’ या विषयावर डॉ. आण्णासाहेब तथा आ.ह. साळुंखे हे व्याख्यान देणार आहेत. महाराष्ट्रातील थोर विचारवंत, व्याख्याते तसेच प्राकृत, पाली आणि संस्कृत भाषेचे विद्वान, प्राचीन सिंधू संस्कृती तसेच बळीराजाचा बळीवंश आणि चार्वाक परंपरेचा तर्कशुद्ध अभ्यास करणारे विचारवंत अशी डॉ.साळुंखे यांची ओळख आहे.
बौद्ध विचारांचे गाढे अभ्यासक, महाराष्ट्रातील फुले,शाहू, आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या एकूणच बहुजन समाजाला वैचारिक भान आणून देणारे प्रबोधनकारी विचारवंत डॉ.साळुखे हे व्याख्यानाच्या निमित्ताने कणकवली शहरात येत आहेत. कणकवली नगर वाचनालयाच्या सभागृहात शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजता होणाऱ्या या व्याख्यानाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अखंड लोकमंच संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी केले आहे.