*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांच्या लेखी आश्वासनानंतर बावशी महिला ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित*
चाळण झालेल्या बावशी रस्त्याची दुरुस्ती करावी यासाठी आज गावातील महिलांनी आंदोलन छेडले. या आंदोलनाची दखल आमदार नितेश राणे यांनी घेऊन पुढील दहा दिवसात हा रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले. दरम्यान दहा दिवसांनी रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाला नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बावशी गावच्या महिलांनी दिला आहे.
तिरंगा ग्राम संघातर्फे हे आंदोलन तोंडवली बावशी फाटा येथे छेडण्यात आले होते. सकाळी आठ वाजल्यापासून गावातील महिला बहुसंख्येने आंदोलन स्थळी जमा झाल्या होत्या.या महिलांनी आंदोलनाच्या ठिकाणी बावशी एसटी रोखून धरली होती.दरम्यान काही कार्यकर्त्यांनी आमदार राणे यांना या आंदोलनाची कल्पना दिली.आमदार राणे हे अधिवेशनाच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी फोनवरून आंदोलन कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि आपण हा रस्ता दुरुस्त करतो अशी ग्वाही दिली.मात्र कार्यकर्त्यांनी तुम्ही लेखी आश्वासन द्या अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी मुंबईहून आपल्या सहीचे पुढील दहा दिवसात हा रस्ता दुरुस्त करण्यात येईल असे पत्र पाठवून लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी तिरंगा ग्राम संघाच्या अध्यक्षा सुप्रिया खडपे, तोंडवली -बावशी सरपंच मनाली गुरव, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,
तोंडवली -बावशी ग्रा. प.सदस्य मनश्री कांडर, तसेच बावशी तिरंगा ग्रामसंघाच्या सचिव दिया राणे,कार्याध्यक्ष रुपाली मरये, सिआरपी संगीता कदम, माजी अध्यक्षा विनिता कांडर, माजी सचिव रेणुका राणे, हेमंत कांडर, विलास कांडर, पोलीस पाटील समीर मयेकर आदी उपस्थित होते.