*कोकण Express*
*महोत्सवात यापुढे नव्या नाट्यकर्मीना संधी द्यावी-ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, रंगकर्मी अतुल पेठे*
*वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गेली ३० वर्षे अव्याहतपणे वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने नाट्य महोत्सवाचे आयोजन करून खऱ्या अर्थाने नाट्यचळवळीच्या संवर्धनाचे काम केले आहे. या देशात अनेक अभिनेते झाले, मात्र त्यांनी थिएटर बांधले नाहीत. परंतु ते काम कणकवलीकरांनी करून दाखवले. त्यामुळेच आज कणकवली एक महाराष्ट्रातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात आहे. प्रतिष्ठानच्या या महोत्सवात यापुढे नव्या नाट्यकर्मीना संधी द्यावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक, रंगकर्मी अतुल पेठे यांनी केले.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे २३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्योत्सवात सहा दिवसात ९ नाटके सादर होणार आहेत. या नाट्योत्सवाचा शुभारंभ गुरूवारी सायंकाळी अतुल पेठे, दिग्दर्शिका सपन सारन यांच्या हस्ते झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, कार्यवाह नारायण देसाई आदी उपस्थित होते. नाट्यचळवळीवर प्रेम करणारी माणसे याठिकाणी पहायला मिळाल्याचे श्री. पेठे यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक वामन पंडित यांनी केले. कार्यक्रमाला नाट्यप्रेमी उपस्थित होते.

