*कोकण Express*
*पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करुन महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांच्या निर्भीडतेला बळ द्या*
*महाराष्ट्र प्रसार माध्यम कर्मचारी संघाचे अध्यक्ष योगेश तांडेल*
कोकणातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करुन महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांच्या निर्भीडतेला बळ द्या अशी मागणी महाराष्ट्र प्रसार माध्यम कर्मचारी संघाचे अध्यक्ष योगेश तांडेल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून केली आहे.
कोकणात प्रकल्पविरोधी लोकांची वृत्तपत्रांमध्ये निर्भीडपणे बाजू मांडणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिसे यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याची घडलेली घटना म्हणजे हा कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांवर झालेला हल्लाच म्हणावा लागेल महाराष्ट्रामध्ये विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केवळ प्रकल्पविरोधीच नव्हे तर प्रत्येक अन्यायाविरोधात निर्भीडपणे पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्यांना अलीकडच्या काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
पत्रकारांवर होणारे हल्ले लक्षात घेता हल्लेखोरांवर कठोर कारवाई करुन न्याय देणे गरजेचे आहे.
कुठलाही प्रकल्प असो अथवा अन्यायग्रस्त लोकांविषयी चांगल्या अथवा विरुद्ध बातम्या या प्रसिद्ध करणे हे निर्भीड पत्रकारितेचे कामच आहे.
कोकणात शशिकांत वारिसे यांच्या झालेल्या हत्येचा आम्ही महाराष्ट्र प्रसार माध्यम कर्मचारी संघाच्या वतीने जाहीर निषेध करत असून आरोपीला कठोर शिक्षा करून शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबाला न्याय देऊन निर्भीड पत्रकारितेला बळ द्यावे अशी मागणी योगेश तांडेल यांनी केली आहे.


