*कोकण Express*
*नडगीवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी – शिवरायांच्या इतिहासाचे भारदस्त सादरीकरण*
*कासार्डे ; संजय भोसले*
आदर्श एज्युकेशन सोसायटी, खारेपाटण संचलित नडगीवे येथील नॅशनल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी शिवरायांची प्रतिमा साकारलेल्या भव्य तैलचित्राची विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून व्यासपीठापर्यंत विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या वेशभूषेतून सादर केलेल्या लेझीमनृत्याच्या तालात आणि वाद्यांच्या गजरात लक्षणीय मिरवणूक काढली. विद्यालयाचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई व संस्थेचे समन्वयक पराग शंकरदास यांनी दीपाचे प्रज्वलन करून शिवरायांची प्रतिमा साकारलेल्या तैलचित्राचे अनावरण केले. तैलचित्रातील शिवप्रतिमेला श्रद्धा व सन्मानपूर्वक पुष्पहार समर्पित करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवेदनाबरोबरच सादरीकरणातून झाले.
आदिलशहा, औरंगजेब यांसारख्या जुलमी राज्यकर्त्यांच्या छळाने त्रस्त झालेल्या प्रजेला अभय देणारा पुत्र किंवा अभय देणारी कन्या आपल्या पोटी जन्माला यावी ही आर्त मागणी आई तुळजाभवानीसमोर जिजामातेच्या अंतकरणातून अभिव्यक्त झालेली यावेळी सादर झाली. यानंतर शिवरायांचा जन्म, पालकारोहण, पाळणागीत आणि शिवरायांच्या बालपणापासून राज्याभिषेकापर्यंतची प्रतापी कारकीर्द व्यासपीठावर विद्यार्थ्यांच्या वेशभूषा, अभिनय, नृत्य आणि गायन-वादन या सांस्कृतिक उपक्रमांनी सादर करण्यात आली. पुढे शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा सादर करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणाच्या प्रवेश द्वारापासून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषेतील शिवराय आणि जिजामाता यांना विद्यार्थ्यांच्या मराठमोळ्या वेशभूषेतील शिवप्रजाजनांनी लेझीम नृत्यांनी स्वागत करीत वाजत- गाजत-गर्जत व्यासपीठावर आगमित केले. व्यासपीठावर मावळ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे पृष्पवृष्टी करून स्वागत केले आणि त्यांना सन्मानाने आसनस्थ केले. विद्यार्थ्यांच्या वेशभूषेतील गागाभट्टानी शिवरायांवर विधियुक्त राज्याभिषेक केला. मावळ्यांच्या प्रजाजनांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी शिवरायांना मानवंदना दिली. शिवरायांचा जयजयकार निनादला. विद्यालयातील सहशिक्षिकांनी मराठमोळ्या वेशभूषेतून शिवरायांची सामुदायिक आरती गाऊन स्तुती केली. विद्यार्थ्यांनी सामूहिक पोवाड्याचे दर्जेदार सादरीकरण केले. शिवस्तुतीतून शिवरायांच्या गुणांचा, पराक्रमांचा आणि कर्तबगारीचा महिमा वर्णन करण्यात आला. अखेर भारदस्त सिंहगर्जनेने कार्यक्रमाची शानदार सांगता झाली.

