*कोकण Express*
*सिंधुदुर्गातील पोलिसांकडून गुन्ह्यांची माहिती देताना काही संशयित आरोपींची नावे गुप्त का ठेवली जातात ??*
*सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ माजी अध्यक्ष गणेश जेठे यांचा पत्राद्वारे सवाल*
*सिंधुदुर्ग*
अलीकडच्या काळात पोलीस स्थानकांकडून काही गुन्ह्यांची माहिती देताना संशयित आरोपींची नावे देण्यास पोलिसांकडून नकार दिला जातो. असे अलीकडे कित्येक वेळा घडत असते. गेले काही वर्षानुवर्षे असे प्रकार कधी घडले नव्हते याबाबत गृह खात्याकडून काही नव्याने नियमावली आली असेल तर त्याची माहिती आम्हाला द्यावी. संशयीत आरोपींना अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत न्यायालयात हजर करावे लागते संशयित आरोपींना हजर केल्यानंतर न्यायालयातील कामकाज हे खुले असल्यामुळे संशयित आरोपींची नावे जनतेसाठी समजण्यास खुली होतचं असतात. त्यामुळे अटकेपासून न्यायालयात हजर करेपर्यंत अशी कोणती आणि किती गुप्तता राहते हा खरा प्रश्न आहे.पूर्वी असे कधीही घडले नव्हते काही गुन्हे वगळता फिर्यादीची नावे जाहीर होतात मग संशयित आरोपीची नावे का गुप्त ठेवली जातात? हा प्रश्न आहे तरी कृपया याबाबतची माहिती आम्हाला मिळावी.
सिंधुदुर्गातील कायदा व सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी पत्रकारांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. जिल्ह्यात पत्रकार आणि पोलीस यांच्यात नेहमी समन्वये आणि सलोखा राहिला आहे. जिल्ह्यातील क्राईमरेट कमी रहावा यासाठी जनजागृती करण्यात पत्रकारांचे आजवर योगदान मोठे आहे. अशा परिस्थितीत नियम अथवा कायद्याचा अडसर नसेल तर गुप्ततेचा बाऊ करून संशयित आरोपींची नावे सांगण्यास टाळाटाळ होते आहे का ? हे तपासून पहावे व आम्हाला याबाबतची माहिती द्यावी असे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल यांना दिले.

