*कोकण Express*
*निवडक नवनिर्वाचित सरपंच प्रशिक्षण शिबिराची सांगता*
*गावचा कारभार सर्वांना सोबत घेऊन करा : राजकीय मतभेद बाजूला ठेवा – आमदार नितेश राणे*
*आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून पार पडले भाईंदर येथे शिबीर ; सरपंच यांनी मानले नितेश राणे यांचे आभार*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून कामाला लागा. आता तुम्ही गावचे सरपंच आहात. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन कामाला लागा. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील निवडक नवनिर्वाचित सरपंचांचे प्रशिक्षण शिबिर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भाईंदर या ठिकाणी संपन्न झाले. शिबिराच्या सांगता समारंभ प्रसंगी आमदार नितेश राणे यांनी उपस्थित राहून सरपंच यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रबोधिनीचे सदस्य मिलिंद आरोलकर, यदुनाथ देशपांडे, श्री पांचाळ आधी उपस्थित होते. आमदार नितेश राणे म्हणाले, प्रत्येक सरपंचाची प्रशासनावर पकड मजबूत असली पाहिजे. भूमिकेवर ठाम राहायला शिकले पाहिजे. गावाच्या हितासाठी कठोर झालं पाहिजे. त्याचबरोबर मतदारांची काळजी घेणे ही देखील सरपंचाची जबाबदारी आहे. दोन दिवस प्रशिक्षणासाठी पाठवण्याचा उद्देश जिल्ह्याच्या बाहेर काय चालतं, सरपंच यांची कर्तव्य, भूमिका याची माहिती मिळावी हाच आहे. आता निवडणुका संपल्या आहेत. मतदान केलेले आणि नाही केलेले देखील आता तुमचेच आहेत. आता तुम्ही गावचा लोकनियुक्त सरपंच आहात. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन कामाला लागा.
यापूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले आहे, सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो. ग्रामपंचायत हे मंत्रालय. त्यामुळे जबाबदारीने कामाला लागा. गावचा सेवक या भावनेतून काम करा. त्याचबरोबर धाडसी निर्णय घ्यायला शिका. जो काम करतो तो चुकतोच. शासनाच्या शंभर टक्के योजना गावात राबविण्याच्या दृष्टीने प्रत्येक सरपंच लोकप्रतिनिधीचे प्रयत्न आवश्यक आहे.असे सांगितले. यावेळी त्यानी प्रबोधिनीच्या नियोजनबद्ध कामाचे कौतुक केले. यावेळी मतदारसंघातील 21 सरपंच उपस्थित होते. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील घोणसरी – मॅक्सी पिंटो, करंजे – सपना मेस्त्री, कळसुली- सचिन पारधीये, नागवे – सिद्धिकी जाधव, तरंदळे – सुशील कदम, हरकुल खुर्द – राजन रासम, वरवडे – करूणा घाडीगावकर, बोर्डवे – वेदांगी पाताडे,
देवगड तालुका – नारिंगरे – महेश राणे, सांडवे – भगवान परब, पाटगाव – नितेश गुरव, पडेल – भूषण पोकळे, कुणकेश्वर चंद्रकांत घाडी, बापार्डे – संजय लाड, सौंदळ – मनाली कामतेकर,
वैभववाडी तालुका – नानिवडे – रेखा खाडे, हेत – कांचन कांबळे, उंबर्डे – वैभवी दळवी, करूळ – नरेंद्र कोलते, सडूरे- दीपक चव्हाण, आचिर्णे – रुपेश रावराणे या 21 सरपंचांचा समावेश होता. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व सरपंच यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले. या शिबिराला तज्ञ मार्गदर्शक मिलिंद आरोलकर, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वायंगणकर, डॉ. प्रसाद देवधर, अमेय देशपांडे, अमेय पवार, योगेश वाळुंजकर यांनी सरपंचांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यदुनाथ देशपांडे तर आभार श्री. सुतार यांनी मानले.