यारा फाउंडेशनला राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार प्रदान

यारा फाउंडेशनला राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार प्रदान

*कोकण Express*

*यारा फाउंडेशनला राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार प्रदान*

*महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्या हस्ते झाला सन्मान*

*हेल्पिंग हँडस वेलफेअर सोसा. च्या वतीने राज्यभरातील नऊ सर्वोत्तम संस्थांना करण्यात आले सन्मानित*

*कणकवली ः प्रतिनिधी*

डोंबिवली येथील हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसा., डोंबिवली यांच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा नवरत्न पुरस्कार कणकवली येथील यारा फाउंडेशला जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी डोंबिवली येथील स्वयंवर सभागृहात महात्मा गांधी यांचे पणतू लेखक तुषार गांधी, हावरे बिल्डर्सच्या चेअरमन उज्वला हावरे आणि झी २४ तास च्या वृत्त निवेदिका अनुपमा खानविलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी हेल्पिंग हँडस वेल्फेअर सोसा. च्या अध्यक्ष डॉ. प्रियांका कांबळे, सचिव गौरी पाटील, माजी अध्यक्ष समीर चव्हाण आदी उपस्थित होते.

संविधानिक मूल्य जपत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वोत्तम ९ संस्थांना नवरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ७५ संस्थांमधून ९ संस्था आणि ३ वैयक्तिक कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली होती. यारा फाउंडेशन २०१७ सालापासून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे आपली समाजाप्रती असणारी जबाबदारी पार पाडत आले आहे. संस्थेमार्फत वृद्धाश्रमांमधील स्त्री-पुरुषांना विरंगुळा मिळाला यासाठी वृद्धाश्रमांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात. तसेच वृद्धाश्रमांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वितरणही केले जाते. २०१९ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या ‘सर्कस’ आणि सर्कस कलाकारांच्या वास्तवाला दर्शविणारी डाक्युमेंट्री संस्थेच्या माध्यमातून तयार करण्यात आली होती. सध्या संस्था सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. विविध कौशल्य विकास कार्यक्रम आणि प्रशिक्षणांद्वारे युवक आणि स्त्रियांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न केले जातात. कोरोना काळात यारा फाउंडेशनने आरोग्याच्या दृष्टीने केलेले काम, पुरग्रस्थांसाठी केलेले मदतकार्य यांचा विचार करता संस्थेला राज्यस्तरीय नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी यारा फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वराज विकास सावंत, श्रेयश अरविंद शिंदे, अक्षय सावंत, निनाद सावंत, अमेय सावंत, अलमास खान, नताशा हिंदळेकर, राकेश चौहान, मनीष तवटे आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!