*कोकण Express*
*कणकवली काॅलेजचे माजी विद्यार्थी व फणसगावचे सुपुत्र शशिकांत शांताराम नारकर यांची आर्मीमध्ये सुभेदार मेजर पदावरती नियुक्ती…!!*
*शशिकांत नारकर यांची आर्मीमध्ये अभिमानास्पद कामगिरी !*
*कासार्डे; संजय भोसले*
आर्मीमध्ये गेली २६ वर्षे उत्तम सेवा बजावत असतांना जिद्द,चिकाटी आणि महत्वकांक्षेच्या जोरावरती कार्यरत असणारे कणकवली काॅलेजचे माजी विद्यार्थी आणि देवगड तालुक्यातील फणसगावचा सुपूत्र तसेच मैत्री परिवारातील सदस्य शशिकांत शांताराम नारकर यांची १ फेब्रुवारी २०२३ रोजी *”सुभेदार मेजर”* या पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे.ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद अशी असल्याने सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे.
शशिकांत नारकर यांची गेल्या सव्वीस वर्षातील आर्मीतील कारकीर्द अतुलनीय कामगिरी बजावणारी ठरली आहे.शशिकांत नारकर याचे आर्मीमध्ये जाण्याचे स्वप्न काॅलेजामध्ये असल्यापासूनच होते.एनसीसीचे विद्यार्थी असल्या कारणाने आर्मीमध्ये भरती होऊन देशाच्या सीमेचे रक्षण करण्याची महत्वकांक्षा त्यांनी मनी बाळगली होती आणि ती सत्यातही उतरवली.या त्यांच्या जिद्दीला सलाम करावा लागेल.
बी.काॅम नंतर शशिकांत लगेच आर्मीमध्ये सोल्जर म्हणून भरती झाले.क्लार्क पदापासून सुरू झालेला त्याचा प्रवास थक्क करणारा असा आहे.नंतर आर्मीमध्ये स्टोअर किपर होते,त्यानंतर बीकाॅम पर्यंत शिक्षण असल्यामुळे आर्मीमध्ये असलेल्या पुढील जबाबदाऱ्या त्यांना खूणवत होत्या.आसाम येथून ट्रेनिंग घेऊन बाहेर पडल्यावर त्यांच्या आर्मीमध्ये पुढचा प्रवास सुरू झाला.एंटरन्स एक्झामनंतर उत्तराखंड रुडकी येथे कार्यरत झाले.बंगाल व पंजाब जालंधर येथे इंजिनिअर होण्यासाठीचे तीन वर्षाचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर पंजाब-जालंधर,नागालँड येथे सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत झाले.त्यानंतर पुढील यशाची शिखरे गाठण्यासाठीची यशस्वी वाटचाल सुरू झाली.
गुजरात गांधीनगर येथे एअरफोर्स मध्ये काही काळ कामगिरी बजावली.त्यानंतर हवालदार पदावरती प्रमोशन मिळाले.पुढे देखील ट्रेनिंगचा सिलसिला सुरुच होता.नंतर पठाणकोठ येथे तीन वर्षे नायब सुभेदार म्हणून कामगिरी बजावली.मग पुढील प्रमोशन मिळाले आणि जम्मू काश्मीरला सुभेदार म्हणून नियुक्ती झाली.
आर्मीमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून यशस्वी कारकीर्द सुरू झाल्यावरती १ फेब्रुवारी रोजी पहिल्याच दिवशी आणखीन एका प्रमोशनची भर पडून “सुभेदार मेजर” हे प्रमोशन त्यांना मिळाले.त्यांच्या आर्मीच्या युनिफॉर्मच्या खांद्यावरील स्टारमध्ये आणखीन एका स्टारची भर पडली आहे.सध्या ते हिमाचल प्रदेश येथील “योल” येथे आर्मीमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत.
कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ सालातील बी.काॅम बॅचच्या मैत्री परिवारातील सदस्य असलेले शशिकांत नारकर यांच्या सारखे शांत स्वभावाचे तसेच जिद्द,मेहनती आणि देश सेवेसाठी आर्मीमध्ये भरती झाल्यावरती सोल्जर पदापासून “सुभेदार मेजर” या पदापर्यंत अथक परिश्रमाने पोहचले आहेत ही बाब निश्चितच अभिमानास्पद व गौरवास्पद आहे.
मैत्री परिवारातील सर्व सदस्यांनी आपला मित्र शशिकांत नारकर “सुभेदार मेजर” या पदापर्यंत मजल मारून पोहचला या गोष्टीचा आनंदोत्सव साजरा केला आणि त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव केला.कणकवली काॅलेजचा माजी विद्यार्थी “सुभेदार मेजर” या पदापर्यंत पोहचला ही घटना काॅलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखीच आहे.तसेच देवगड तालुक्यातील फणसगाव व विठ्ठलादेवी गावच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने अभिमानास्पद आणि उर भरुन आणणारी म्हणावी लागेल.विठ्ठलादेवी गावचे सरपंच दिनेश नारकर यांचे सुभेदार मेजर शशिकांत नारकर हे बंधू होत.तसेच फणसगाव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम नारकर यांचे ते चिरंजीव आहेत.या निवडी बद्दल फणसगाव पंचक्रोशीत आनंदाचे,उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.शशिकांत नारकर यांच्या उल्लेखनीय कार्याचा व कामगिरीचा सर्व स्तरातून गौरव करण्यात येत आहे.