*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सची करूळ येथील हुतात्मा स्मारकास भेट*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्यावतीने हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विष्णू फुलझेले यांचे हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींची हत्या झाली तो दिवस देशभर हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याप्रसंगी बोलताना विभाग प्रमुख डॉ. राज ताडेराव म्हणाले की गांधीजींचे विचार प्रेरक होते. स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींनी दिलेले विचार महत्त्वाचे होते त्या विचाराने देशातील आबाल वृद्ध स्वातंत्र्यसैनिक बनले. त्यांच्या लढ्यात शांती व अहिसा हे तत्व होतं त्याला जगाने मान्यता दिली आणि त्याचाच अंगीकार आजही केला जातो. असे प्रतिपादन केले. यावेळी महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्स, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.
त्यानंतर महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी करूळ येथील हुतात्मा स्मारकास भेट देऊन शहिदास मानवंदना दिली. या कार्यक्रमास बॅ.नाथ पै ज्ञानप्रबोधनी हायस्कूलचे एनसीसी कॅडेट्स सुद्धा उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण नारकर यांनी हुतात्मा दिनाचे महत्त्व सांगून हुतात्मा भास्कर कर्णिक, हुतात्मा गणेश आठले, हुतात्मा अनंत कान्हेरे या क्रांतिकारकांच्या कार्याच्या इतिहासाला उजाळा दिला तर लेफ्ट. राज ताडेराव यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे योगदान सांगून क्रांतिकारकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती दिली. हुतात्मा स्मारकामुळे क्रांतिकारकांच्या शौर्याची माहिती मिळते. क्रांतिकारकांच्या त्यागामुळेच आपल्या देशाला स्वतंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे शाहिदाचा सन्मान केला पाहिजे असे त्यांनी विद्यार्थी व कॅडेट्सना संबोधन करतांना सांगितले .या कार्यक्रमाप्रसंगी श्री. शंकरदास के.ई., श्री.गोसावी आर. जी., श्री. खटावकर एस. एल., श्री.हेमंत कदम, श्री. निलेश फोंडेकर सिनियर कॅडेट स्वप्नील शिरवलकर, सार्जेंट हर्षाली कारेकर व बहुसंख्य विद्यार्थी व एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते.