*कोकण Express*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळच्या सत्रात भराडी देवीचे घेणार दर्शन..*
*आंगणेवाडीच्या पवित्र भूमीतून जिल्हा विकासाचे मुख्यमंत्र्यांकडे घालणार साकडे…*
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, ब्रि. सुधीर सावंत यांची माहिती
*मालवण ः प्रतिनिधी*
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा ४ फेब्रुवारी रोजी होत आहे. या यात्रेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहून भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे मुख्यमंत्री यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्या समवेत राज्य मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे, शंभूराजे देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळच्या सत्रात देवीचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर जिल्ह्यात येत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आंगणेवाडीच्या पवित्र भूमीतून जिल्हा विकासाचे साकडे घालणार असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मालवण येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. मुख्यमंत्री निश्चितच सिंधुदुर्गसाठी भरभरून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मालवण चिवला बीच येथे ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपजिल्हा संघटक नीलम शिंदे, तालुकाप्रमुख महेश राणे, विश्वास गावकर, राजा गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, महिला तालुकाप्रमुख सोनाली पाटकर, कविता मोंडकर, हर्षद पारकर, कमलाकांत पारकर, अरुण तोडणकर, राजा तोंडवळकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.