*कोकण Express*
*कवी अजय कांडर यांची ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ दीर्घ कविता असत्य राजकीय प्रवृत्तीचा शोध घेते*
*’अजूनही जिवंत आहे गांधी’ चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे प्रतिपादन*
*’अजूनही जिवंत आहे गांधी’ संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचेही प्रकाशन*
*मालवण/प्रतिनिधी*
कवी अजय कांडर यांना आपण काव्य लेखन का करतो आहोत याचं नेमकं भान आहे. त्यांची एकूणच आजवरची काव्य लेखनाची वाटचाल लक्षात घेता त्यांनी ज्या धाडसाने काव्य लेखन केले आहे त्याबद्दल त्यांचे कौतुकच करायला हवे. ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ ही त्यांची दीर्घ कविता असत्य राजकीय प्रवृत्तीचा शोध घेते आणि दुसऱ्या बाजूला गांधी विचार हा सर्वव्यापी आहे याच्याही मुळाशी ही कविता जाते असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत हेमंत देसाई यांनी केले.
मालवण बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे सेवांगणच्या सभगृहात ‘गांधीजागर’ उपक्रमात कवी अजय कांडर लिखित आणि पुणे हर्मिस प्रकाशन प्रकाशित ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या दीर्घ कवितेवर श्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना श्री देसाई यांनी भ्रष्ट, मुजोर, तुच्छतावादी आणि हुकूमशाहीचे समर्थन करणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेचे आणि त्या व्यवसस्थेत सहभागी झालेल्या राजकीय नेतृत्वाचे बुरखे पाडण्याचेही काम ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ ही कविता करत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. पुणे विद्यापीठातील साहित्य आणि शिक्षणशास्त्र अभ्यासक प्रा नवनाथ तुपे, ज्येष्ठ पत्रकार आणि लोककला अभ्यास मुकुंद कुळे, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते कॉ. संपत देसाई, लेखक आणि संपादक सुशील धसकटे आदी सहभागी झालेल्या या चर्चासत्रात ज्येष्ठ लेखक आणि वक्ते चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले आणि बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर, प्रा. प्रिया सुशील आदींच्या उपस्थितीत “अजूनही जिवंत आहे गांधी” या संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा. तुपे म्हणाले, ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ ही कविता भारतीय समाजातील वर्तमान वास्तवाला अधिक भिडते. सत्ता, संपत्ती टिकविण्यासाठी समाजात जे लोक तेढ व द्वेष यामधून राजकता प्रस्थापित करू पाहत आहेत अशा मूलतत्त्ववादी लोकांना अजूनही गांधींचे भय का वाटते? ते गांधीला का संपू पाहतात आणि त्यांच्याकडून गांधी का संपता संपत नाही या प्रश्नांचा शोध ही कविता घेते. यामुळे खऱ्या अर्थाने ही कविता समकालीन आहे. म्हणूनच तिचं महत्त्व मराठी साहित्यात अनन्यसाधारण आहे.
श्री कुळे म्हणाले, आयुष्यभर गांधीना विरोध करणाऱ्या पक्षाला आणि पक्षाच्या नेतृत्वालाही गांधींना कितीही टाळायचं म्हटलं तरी टाळता येत नाही. गांधी आणि गांधी विचार त्यांच्यासाठी एक प्रकारे अवघड जागेचे दुखणे बनले आहे. पण ते सहन करण्या वाचून आताच नाही तर पुढच्या काळातही त्यांच्यासमोर पर्याय असणार नाही.याच अर्थाने गांधी या पृथ्वीतलावरचे शाश्वत मूल्य ठरले आहे, आणि अजय कांडर यांनी ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ ही दीर्घ कविता लिहिताना या शाश्वत मूल्याचा ऊर्जस्वल स्वरात उच्चार केला आहे.सध्याच्या एकूणच धार्मिक तेढीच्या काळात हा उच्चार अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच ‘अजूनही जिवंत आहे गांधी ही कविता’ या काळात महत्त्वाची ठरते.
संपत देसाई म्हणाले, “अजूनही जिवंत आहे गांधी” या कवितेतील स्त्री विषयक भाग आवर्जून वाचला गेला पाहिजे. ज्या तत्त्वावर आणि मूल्यावर गांधीजी संपूर्ण आयुष्य जगले त्या मूल्यांचा आग्रह ही कविता धरतेच परंतु गांधींवर हजार दहा गोळ्या घालूनही गांधी नेमके कोणत्या कारणाने या जगात उरतात आणि विरोधकांनाही छळतात याची नेमकी मिमांसा ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ ही कविता करते.
श्री धसकटे म्हणाले,महात्मा गांधी हे एक उत्तम लेखक होते. त्यांनी आपली साहित्यावरील मते अनेक ठिकाणी व्यक्त केलेली आहेत. “आपल्यामध्ये ज्या ज्या सुप्त सदभावना आढळतात, त्या जागृत करण्याची शक्ती ज्यामध्ये असते तो म्हणजे कवी,’ असे गांधी म्हणतात. गांधींनी उत्तम साहित्याची जी काही वैशिष्ट्ये सांगितली आहेत, ती सर्व वैशिष्ट्य अजय कांडर यांच्या “अजूनही जिवंत आहे गांधी” या दीर्घकवितेत आपल्याला ठळकपणे दिसतात. गांधी यांच्या सत्य-अहिंसा-प्रेम-सदभावना आदी मूल्यांवर कांडर यांची ही संपूर्ण कविता उभी आहे.
यावेळी कवी अजय कांडर यांनीही आपले विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रा.प्रिया सुशील यांनी मानले.