*कोकण Express*
*सर्वच समाजघटकांच्या उत्कर्षाचा विचार झाला पाहिजे : ना. उदय सामंत*
*फोंडाघाट येथील पुर्णानंद भवन लोकार्पण व पुर्णानंद पर्णकुटी प्रवेशारंभ सोहळा*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
आपल्या ज्ञाती बांधवांचे हित जपत असताना समाजातील अन्य घटकांच्या उत्कर्षासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. या वास्तूतून सामाजिक, शैक्षणिक काम उभं राहिल पाहिजे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. इतर समाजासाठी आपण किती उपयोगी पडतो हे अधिक महत्वाचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी येथे केले. फोंडाघाट येथील पुर्णानंद भवन लोकार्पण सोहळा व पुर्णानंद पर्णकुटी प्रवेशारंभ सोहळा निमित्ताने ते बोलत होते. कुडाळेशकर आद्य गौड बाह्मण ज्ञातीच्या पुर्णानंद भवनचा लोकार्पण सोहळा उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. व्यासपिठावर डॉ. एम.डी. देसाई, मंडळाचे अध्यक्ष सुरेश सामंत, मनिष दाभोळकर, दाभोली मठाचे कार्याध्यक्ष विकास प्रभू, गोरेगाव मंडळाचे न.नी.पंतवालावलकर, उद्योजक दत्ता सामंत आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रदिप नेरूरकर यांनी केले. कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीची व्याख्या सांगण्याएवढा मी मोठा नाही असे सांगून ना. उदय सामंत म्हणाले, ज्ञाती बांधव जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची ताकद मोठी होते. ज्ञाती बांधवाला पुढे जाण्यासाठी बांधवांनी साथ दिली पाहिजे. प.पू. पुर्णानंद स्वामींच्या आशीर्वादाने आणि सर्व समाज घटकांमुळे मी चारवेळा निवडुन येऊ शकलो. रत्नागिरी मतदार संघातील जनतेने माझ्यावर सतत विश्वास दाखवला. ज्या वास्तूचा मी आज लोकार्पण केले आहे त्या वास्तूमध्ये समाजातील सर्वांनाच या वास्तूचा उपयोग झाला पाहिजे. विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य झाले पाहिजे. दुसऱ्या समाज घटकांसाठी उपयोगी पडता आले तर त्याचा अधिक आनंद आहे. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी घडले पाहिजेत. यासाठी दहावीच्या परिक्षेत राज्यात प्रथम आलेल्या मंगेश म्हैसकर या विद्यार्थ्यांचे सामाजिक बांधिलकीचे उदाहरणही ना. उदय सामंत यांनी दिले. मनिष दाभोलकर यांनी फोंडाघाट येथील पुर्णानंद भवनला एक लाखाची देणगी दिली. दाभोली मठाचे विकास प्रभू यांनी दाभोली मठामध्ये राबविण्यात येणाऱ्या नवीन संकल्पना मांडल्या. गोवा येथील ज्ञाती मंडळाकडून चंद्रशेखर वेळगेकर यांच्या हस्ते ५५५५५/- रूपये देणगी देण्यात आली. यावेळी उद्योजक दत्ता सामंत म्हणाले कणकवली तालुक्यातील कुडाळदेशकर ज्ञाती बांधव एकत्र येऊन ही वास्तू उभारून सर्वसमाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. सर्वजण एकत्र येऊन किती चांगल काम करू शकतात हे यातून दिसून आले आहे. मी या मंडळाच्या नेहमीच सोबत आहे असे सांगत कुडाळदेशकर समाजातर्फे घेण्यात येणाऱ्या केपीएल क्रिकेट स्पर्धा मालवणला घेण्याचे त्यांनी निमंत्रणही यावेळी दिले. शेवटी अध्यक्ष सुरेश सामंत यांनी कामकाजाचा आढावा घेताना दरवर्षी ज्ञाती बांधवांना एकत्र करणारा वर्धापनदिन सोहळा, रक्तदान शिबीर आदी उपक्रमही राबविण्याचा संकल्प त्यांनी केला. यावेळी सूत्रसंचलन राजा सामंत यांनी केले तर आभार प्रदर्शन जान्हवी सुयोग टिकले यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी राजापूर तालुक्यातील कुंभवडे, कणकवली तालुक्यातील ज्ञाती बांधव उपस्थित होते. कवी विलास खानोलकर यांनी या समारंभासाठी गीत संगीतकार केले होते. हा समारंभ यशस्वी होण्यासाठी सुरेश सामंत, न्हानू देसाई, वालावलकर, नेरूरकर, प्रथमेश महाजन, हर्षद केळूसकर, अरूण सामंत, राजू आजगावकर, लता खानोलकर, निशा केळूस्कर, गिता सामंत, स्वामिनी सामंत, डॉ. गुरुनाथ प्रभू, उद्योजक मंगेश परुळेकर, अरविंद पाटील, दामोदर खानोलकर व पुर्णानंद महिला मंडळ ग्रृपने हा सोहळा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.