*कोकण Express*
*भिरवंडे रामेश्वर मंदिरात शनिवारपासून अखंड हरिनाम सप्ताह विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात माघ शुध्द रथसप्तमीपासून अर्थात शनिवार 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह उत्सवासाठी मंदिर आणि परिसराची सजावट करण्यात आली असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आठ दिवस या सप्ताह उत्सवामुळे भिरवंडे गाव भक्तीरसात न्हाऊन निघणार असून प्रतिपंढरपुरच अवतरणार आहे.
कणकवलीपासून सुमारे 16 कि.मी.वर सह्याद्रीच्या पायथ्याशी भिरवंडेच्या निसर्गरम्य परिसरात श्री देव रामेश्वर मंदिर वसले आहे. हे मंदिर जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास आले आहे. मंदिर परिसरात गर्द वनराई आणि भव्य असे भक्तनिवास, बालोद्यान आहे, सुसज्ज पार्किंगचीसुविधा आहे. पर्यटन क्षेत्र म्हणून या मंदिर परिसराचा विकास करण्यात आला आहे. रथसप्तमीपासून सुरू होणार्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी मुंबई तसेच विविध भागांत नोकरी धंद्यानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी मंडळी मोठ्या संख्येने गावात दाखल होणार आहेत. भव्यदिव्य स्वरुपात साजरा होणार्या या हरिनाम सप्ताहाला जिल्ह्याच्या कानाकोपर्यातील भाविक भक्तगण येतात. सप्ताह कालावधीत 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान दु. 1 ते 3 या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रौ गावोगावच्या दिंड्या, भजने, चित्ररथ आणि नंतर ढोलताशांच्या गजरात श्री देव रामेश्वराची पालखी प्रदक्षिणा होणार आहे.
रामेश्वर मंदिरात शनिवारी 28 जानेवारीला दु. 2 वा. घटस्थापना होणार आहे. त्यानंतर सायं. 7 वा. पोखरण येथील हरिपाठ आणि वारकरी भजन, रविवार 29 जानेवारी रात्री 9 वा. श्री लिंगेश्वर पावणादेवी दिंडी, नृत्य भजन मंडळ-सातरल, सोमवार 30 जानेवारी रात्री 9 वा. वारकरी भजन, वेंगुर्ला. मंगळवारी 31 जानेवारीस दु. 12 वा. बुवा गिरीश घाडीगावकर हरकुळ बुद्रुक येथील भजन, सायं. 7 वा. पोखरण येथील गजानृत्य, रात्री 9 वा. भजन बुवा शशिकांत राणे, जानवली, रात्री 10 वा. बुवा हेमंत तेली, फोंडाघाट यांचे भजन सादर होणार आहे. बुधवारी 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वा. महिला भजन भिरवंडे, दु. 12.30 वा. सदगुरु श्री वामनराव पै प्रणित उपासना यज्ञ, हरिपाठ व संगीत जीवनविद्या सादरकर्ते जीवनविध्या मिशन शाखा-कणकवली, रात्री 9.30 वा. चित्ररथ-बालशिवाजी स्कूल कणकवली, रात्री 10 वा. संगीत भजन सुप्रसिध्द बुवा संदिप लोके लिंगडाळ. गुरूवारी 2 फेब्रुवारीला दु. 12 वा. महिला भजन-मुंबई, सायं. 5 वा. भजन-वारकरी सांप्रदाय कणकवली, गणेश मंदिर एसटी वर्कशॅाप, रात्री 9 वा. महिला भजन चाफेड, रात्री 10 वा. चित्ररथ प्राथमिक केंद्रशाळा भिरवंडे, शुक्रवारी 3 फेब्रुवारीस दु. 12 वा. गीतरामायण-विनोद गोखले, दु. 1 वा.संगीत भजन-बुवा केदार कोदे (दत्तप्रसाद भजन मंडळ-वरवडे), रात्री 9 वा. भजन बुवा-प्रकाश चिले (विष्णू स्मृति मंडळ, डोंबिवली) रात्री 10.30 वा. चित्ररथ-माध्यमिक विद्यामंदिर कनेडी. शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी दु. 2 वा. या अंखड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी या हरिनाम सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवालय संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत व भिरवंडे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.