*कोकण Express*
*कवी अजय कांडर यांच्या “अजूनही जिवंत आहे गांधी” या दीर्घ काव्यसंग्रहच्या दुसऱ्या आवृत्तीचे 28 रोजी मालवण येथे प्रकाशन*
*ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन आणि परिसंवाद सोहळा*
*प्रा डॉ नवनाथ तुपे, मुकुंद कुळे, कॉ. संपत देसाई, सुशील धसकटे आदी अभ्यासकांचा वक्ते म्हणून सहभाग*
*कणकवली/प्रतिनिधी*
कवी अजय कांडर यांच्या पुणे हर्मिस प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या बहुचर्चित अशा “अजूनही जिवंत आहे गांधी” या दीर्घ कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शनिवार 28 जानेवारी 2023 रोजी दु. २ वा. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण येथे करण्यात येणार असल्याची माहिती सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी दिली.
या संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. हा संग्रह अल्प कालावधीतच बहुचर्चित झाला. त्यानंतर आता बॅरिस्टर नाथ पैसे सेवांगणतर्फे शनिवार 28 आणि रविवार 29 जानेवारी या कालावधीमध्ये ‘गांधी जागर” या राज्यस्तरीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सदर “अजूनही जिवंत आहे गांधी” या दीर्घ काव्यसंग्रहावर ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत हेमंत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री देसाई यांच्या हस्ते “अजूनही जिवंत आहे गांधी” या संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
महात्मा गांधींनी आपल्याला अहिंसेचा मार्ग दिला असला तरी आपण आज सर्वाधिक हिंस्र बनत गेलो. गांधीजींनी आपल्याला शांततेचा विचार दिला, मात्र आपण अशांततेचा कल्लोळ माजवला. शोषित-गोरगरीब-कष्टकरी वर्ग निवस्त्र पाहून गांधीजी संपूर्ण हयातभर साध्या पंचावर राहिले. आपण मात्र पोशाखी जगण्यासाठी गरिबांच्या श्रमावर आणि त्या श्रमाला हीन लेखत उभे राहिलो. गांधींनी स्वदेशीचा विचार दिला, आपण मात्र आपली भूमीच नापीक केली. गांधीजींनी जात आणि धर्माचा राजकारणासाठी कधीच उपयोग केला नाही. आज मात्र गांधींच्या नावालाच प्रतिरोध करत “जात आणि धर्मा”चं हिणकस राजकारण केलं जातंय. अखेर हे एवढं टोकाला गेले आहे, की एका बाजूला संख्येने अल्प असलेला विचारशील भारत, तर दुसऱ्या बाजूला बहुसंख्य हिंसक भारत, अशी स्पष्ट विभागणी झालेली दिसते. हे सर्व पाहता अंतिमत: आज पुन्हा गांधी विचारांचीच कास धरल्याशिवाय देशापुढे दुसरा पर्याय नाही. अशी मांडणी “अजूनही जिवंत आहे गांधी” या दीर्घ संग्रहात करण्यात आली आहे. या अनुषंगाने यावेळी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात साहित्य आणि शिक्षणशास्त्रचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यासक डॉ. नवनाथ तुपे, मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लोककला अभ्यासक मुकुंद कुळे, आजरा येथील लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते कॉ. संपत देसाई, लेखक आणि संपादक सुशील धसकटे अजूनही जिवंत आहे गांधी या संग्रहावर मांडणी करणार आहेत. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे येथील प्रा.प्रिया सुशील करणार आहेत. तरी साहित्य रसिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी केले असून अधिक माहितीसाठी संपर्क- लक्ष्मीकांत खोबरेकर- कार्यवाहक सेवांगण- (94 22 94 62 12)