*कोकण Express*
*सावित्रीच्या लेकी साहित्य उत्सव 4 जानेवारी रोजी
समाज साहित्य संघटना-नाथ पै सेवांगणतर्फे आयोजन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राज्य शासनाने सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.या पार्श्वभूमीवर समाज साहित्य संघटना सिंधुदुर्ग आणि नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने 4 जानेवारी राजी सायं. 7 वा. रोजी ‘सावित्रीच्या लेकी साहित्य उत्सव’ या संमेलनाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील विख्यात कवयित्री कल्पना दुधाळ (पुणे) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती साहित्य समाज संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष एड. देवदत्त परुळेकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग सुपुत्र माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली त्याचबरोबर महाराष्ट्रात यावर्षीपासून सावित्रीबाईंचा जन्मदिवस समता उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सावित्रीच्या लेकी साहित्य उत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी या देशात पहिल्यांदा स्त्री शिक्षण सुरू केले. आज महिला सबलीकरण झाले आहे यामागे सावित्रीबाईंचे मोठे योगदान आहे. त्यांनी पुणे भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि पुढे महिलांसाठी शिक्षणाचे पर्व सुरू झाले.या सगळ्या पार्श्वभूमीवर समाज साहित्य संघटने आणि नागपूर सेवांगणतर्फे सावित्रीच्या लेकी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात दुधाळ या ‘सावित्रीबाई आणि शिक्षण’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. तर मधुकर मातोंडकर हे ‘सावित्रीबाई आणि त्यांच समाजकार्य’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. या संमेलनात महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवयित्री यांचे काव्यवाचन होणार असून यात प्रा. डॉ पद्मरेखा धनकर (चंद्रपूर) कविता शिर्के (शिरूर) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्वेतल परब, मनीषा जाधव, नीलम यादव, सरिता पवार, मनीषा पाटील, मेघना सावंत, प्रमिता तांबे आदींचा समावेश आहे. संमेलनाच्या अध्यक्षा दुधाळ या समकालीन पिढीतील महत्त्वाच्या कवयित्री असून ‘सिझर कर म्हणते माती’ आणि ‘धग असतेच आसपास’ हे दोन बहुचर्चित कवितासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. जैन उद्योग समुहाच्या बालकवी पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. या साहित्य संमेलनाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी संपर्क- सरिता पवार-सचिव समाज साहित्य संघटना सिंधुदुर्ग.(9604655844)