*कोकण Express*
*तरळे-कासार्डे येथील राणे कुटुंबियांच्या नशिबात दुर्दैवाचे “दशावतार”…*
*कॅन्सर उपचारासाठी मदतीची मागणी; दानशूरांनी पुढे यावे, ब्रेकिंग मालवणीची “हाक”…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कासार्डे येथील राणे दाम्पत्याच्या नशिबात “दुर्दैवाचे दशावतार” सुरू आहे. ५५ वर्षीय पती मंगेश हे पॅरलीसीसमुळे जायबंदी झालेले असतानाच त्यांच्या अवघ्या ३४ वर्षीय पत्नी सौ.नम्रता राणे या गर्भपिशवीच्या कॅन्सरचा सामना करत आहेत. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे तसेच तीन लहान मुले असल्यामुळे आता करायचे काय ? उपचार घ्यायचे, संसाराचा रहाटगाडगा चालवायचा, की पोरांचे शिक्षण करायचे ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे सामाजिक भावनेतून त्यांच्या मदतीसाठी समाजातील दानशूरांनी पुढे यावे, अशी कळकळीची हाक ब्रेकिंग मालवणीच्या माध्यमातून राणे कुटुंबीयांनी दिली आहे.
संबंधित राणे कुटुंब हे तरळे-कासार्डे येथील शिक्षक कॉलनी राहत आहे. पती मंगेश राणे हे ५५ वर्षाचे असून त्यांना पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे त्यांना चालता येत नाही. त्यामुळे संसाराचा रणगाडा थांबला आहे. ही परिस्थिती असतानाच आता दुसरीकडे सौ. नम्रता यांना गर्भपिशवीचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. सद्यस्थितीत त्या कणकवली येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांच्या उपचारासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजातील दानशूरांनी आपल्याला मदत करावी, अशी कळकळीची साद त्यांनी दिली आहे. त्यांच्या या आजारामुळे त्यांच्या समवेत असलेल्या निशा आणि तृप्ती या दोन मुली आणि अवघ्या बारा वर्षाचा विनायक हा मुलगा यांच्यासमोर शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे आता करायचे काय ? असा सवाल राणे कुटुंबाकडून स्वतःच्या नशिबाला विचारला जात आहे. तर आपल्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाचीही जबाबदारी कोणीतरी पुढाकार घेऊन स्वीकारावी, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तीनी त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी ब्रेकिंग मालवणी परिवाराच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींना मदत करायची आहे त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र 60226556168, IFSC:- MAHB0001397 या बँक खात्यात आपली मोलाची रक्कम जमा करावी, तसेच अधिक माहितीसाठी त्यांच्याशी 86008 83038 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

