व्यसनमुक्तीच्या चळवळीतील युवांचा सहभाग ही कौतुकास्पद बाब – अमोल माडामे

व्यसनमुक्तीच्या चळवळीतील युवांचा सहभाग ही कौतुकास्पद बाब – अमोल माडामे

*कोकण Express*

*व्यसनमुक्तीच्या चळवळीतील युवांचा सहभाग ही कौतुकास्पद बाब – अमोल माडामे*

*नशाबंदी मंडळ आयोजित व्यसनमुक्ती परिसंवादात कायदा, राजकीय, सामाजिक अंगाने साधण्यात आला संवाद*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने काल दिनांक २२ जानेवारी, २०२३ रोजी कणकवली गोपुरी आश्रम सभागृह येथे ‘व्यसनमुक्ती संमेलन’ पार पडले. यावेळी नशाबंदी मंडळाची भूमिका याविषयी मान्यवरांनी चर्चा केली. तसेच यानिमित्ताने व्यसनमुक्ती परिसंवाद आणि व्यसनमुक्ती काव्य स्पर्धा आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

परिसंवाद मध्ये ऍड. प्राजक्ता शिंदे यांनी ‘कायद्याच्या भूमिकेतून व्यसनमुक्ती’ कशी करता येईल, याबाबत मांडणी केली. व्यसनमुक्तीसाठी कठोर कायदा आहे. परंतु त्या कायद्यातील पळवाटाच जास्त शोधल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुक्तांगण पुणेचे समुपदेशक विभागप्रमुख निहार हसबनिस यांनी मुक्तांगण च्या कामाबद्दल माहिती सांगितली आणि ‘व्यसनावर उपाययोजना’ या विषयावर मांडणी करत ते म्हणाले की, दारू पिणे हा आजार आहे. मात्र त्यावर उपचार उपलब्ध आहे. दारुड्याला एक आजारी व्यक्ती म्हणून ट्रीट केलं पाहिजे, असे ते म्हणाले. यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमोल कदम यांनी ‘राजकीय भूमिकेतून व्यसनमुक्ती’ या विषयावर मांडणी करत असताना धर्मानंद आणि सयाजीराव गायकवाड यांची गोष्ट सांगून तत्कालीन राज्यव्यवस्था काय करत आहे, कोरोनामध्ये कर वाढावा म्हणून शासनाने सुरू केलेली दारूची आणि दारूसाठी लागलेली रांगा ह्या शोकजनक होत्या. तसेच कायद्याच्या आधारावर दिले जाणारे परवाने रद्द करून रिसोर्स बंद करावेत, असे ते म्हणाले. तसेच राजव्यवस्थेची मानसिकता ही देश, राज्य व्यसनमुक्त करण्याची नाहीये. त्यांनी जर ती बाळगली तर ते शक्य होण्याची शक्यता आहे, असा विचार त्यांनी व्यक्त केला. ‘सामाजिक भूमिकेतून व्यसनमुक्ती’ या विषयावर लेखक, कवी, पत्रकार श्रेयश शिंदे यांनी मांडणी करत असताना सामाजिक बाजूने व्यसनमुक्ती कशी शक्य आहे आणि समाज हा कशाप्रकारे व्यसनाधीन होत आहे याकडे लक्ष वेधले. साहित्य आणि समाज यांचा असलेला सहसंबंध आणि समाज परिवर्तनासाठी संत साहित्यापासून सुरू असेलेले साहित्यिकांचे प्रयत्न यावर भाष्य केले. तसेच व्यसने आणि चित्रपट-मीडिया यांची भूमिका याविषयी आपले मत मांडले. अध्यक्षीय समारोपात अमोल माडामे यांनी आपण असे मानून बसलो आहे की, तरुण युवा पिढी या व्यसनमुक्तीच्या बाजूने विचार करीत नाही. पण आज ज्या युवांनी येथे जी कायदेशीर, राजकीय आणि सामाजिक बाजूने मांडणी केली आहे ती खूपच कौतुकास्पद आहे, असे मत व्यक्त केले.

यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबईचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबईचे राज्य संघटक अमोल माडामे तसेच सुरेश पाटील, दोडामार्ग कॉलेजचे प्राचार्य सुभाष सावंत, जिल्हा रुग्णालय मनोरुग्ण तज्ज्ञ रेश्मा भाईप, सिंधुदुर्ग शाखेचे संघटक अर्पिता मुंबरकर, राजेंद्र मुंबरकर, व्यसनमुक्ती सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक, मनोज गिरकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!