*कोकण Express*
*पोस्टासाठी आरक्षित असलेली जागा मल्टीस्पेशालिटीसाठी देण्यास तयार..*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी उद्यानाच्या परिसरात पोस्टासाठी राखीव ठेवण्यात आलेली तीन एकर जागा आपण द्यायला तयार आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयात सुरू असलेला दावा सुध्दा मी मागे घेईन, अशी भूमिका सावंतवाडी भाजपाचे शहर चिटणीस तथा जमिन मालक विनोद सावंत यांनी घेतली आहे.
वादातील जागेत मल्टीस्पेशालिटीचा प्रश्न रेंगाळत आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन मंत्री दीपक केसरकर यांनी योग्य तो मोबदला देवून ही जागा ताब्यात घ्यावी. शहरातच ही जागा असल्यामुळे सर्वांना सोईचे होईल, असेही त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी ब्रेकिंग मालवणीला आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा शहर अध्यक्ष अजय गोंदावळे उपस्थित होते.
यावेळी सावंत म्हणाले, पोस्टाचे कार्यालय तसेच कर्मचाऱ्यांना निवास व्यवस्था उभारण्यासाठी १९८२ मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून अवघ्या ५२ हजार रुपयात ही जागा आरक्षित करण्यात आली होती. मात्र गेल्या ३९ वर्षात या ठिकाणी साधी वीट सुध्दा रचण्यात आली नाही. त्यामुळे बारा वर्षानंतरही जागा वापरली नाही. त्यामुळे ती आमच्या ताब्यात पुन्हा देण्यात यावी, अशी मागणी करीत मी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर अद्याप दावा सुरू आहे.
एकुण ही आरक्षित जागा तब्बल ९६ गुंठे इतकी आहे. तर बाजूला माझ्या मालकीची आणखी ३० गुंठे जागा आहे. त्यामुळे ही सर्व जागा आरक्षित करण्यात आल्यास त्याचा फायदा सावंतवाडीकरांना होणार आहे. रखडलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्गी लागणार आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या वस्तीत जाण्यासाठी रस्त्याची सोय होणार आहे. त्यामुळे माझ्या मागणीचा विचार करण्यात यावा, असे सावंत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या मागणीला शहर अध्यक्ष गोंदावळे यांनी ही अनुमोदन दिले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असल्याने ही जागा तात्काळ ताब्यात घेवून त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी उभारा अशी मागणी आम्ही आमच्या नेत्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.