*कोकण Express*
*प्रशिक्षण माणसात आत्मविश्वास निर्माण करते ; श्री. सुभाष सावंत*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथे विविध व्यवसाय प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या सहकार्याने स्पर्धा परीक्षा विभाग, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री.सुभाष सावंत बोलत होते. येणारा काळ हा नोकरी मिळवण्याचा राहिला नसून आपला रोजगार आपणच निर्माण करण्याचे दिवस आलेले आहेत. रोजगार प्रशिक्षण आपल्यात आत्मविश्वास वाढवते आणि हाच आत्मविश्वास आपल्याला स्वयंपूर्ण बनवतो. महाविद्यालयीन शिक्षण हे पुस्तकापुरते मर्यादित न राहता व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे. त्यादृष्टीने फोंडाघाट महाविद्यालयाने आयोजित केलेली सहाय्यक सौंदर्य साधना व वायरमन ही प्रशिक्षणे अतिशय महत्त्वाची असून त्यातून उद्याचा स्वयंपूर्ण नागरिक घडेल, असे प्रतिपादन केले.
जन शिक्षण संस्थांची भूमिका मांडताना कार्यक्रम अधिकारी श्री. रमेश खरात म्हणाले की शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालयाच्या माध्यमातून नाममात्र फीच्या आधारे ही प्रशिक्षणे आयोजित केली जातात. युवकांच्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा विकास केला जातो. हे प्रशिक्षण घेत असताना फावल्या वेळेत हे प्रशिक्षण तुम्ही घेऊ शकता. अशा प्रशिक्षणाचा फायदा मोठा असतो. याची परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे. लेखी व प्रात्यक्षिक अशा स्वरूपात ही परीक्षा असणार आहे. आपल्या कौशल्याचा विकास करून रोजगार प्राप्त करा. असे आवाहन केले.
उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करताना प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले म्हणाले की महासत्तेच्या आव्हानात टिकून राहण्यासाठी स्वयंरोजगार निर्माण झाले पाहिजेत. नोकऱ्या मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यात आपल्याला स्वयंरोजगारच वाचवू शकतो. ब्युटी पार्लर आणि वायरमन ही दोन्ही प्रशिक्षणे अशी आहेत की आपले अन्य व्यवसाय सांभाळून उत्पन्नाचा वेगळा स्त्रोत निर्माण करू शकतो. त्यामुळे ही प्रशिक्षणे अत्यंत महत्त्वाची आहेत. आपल्या महाविद्यालयीन जीवनातच आपण प्रशिक्षित झालो तर शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण पैसे कमवू शकतो. असे प्रतिपादन केले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर श्री. गणेश शिवथरे उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणाला शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणानंतर बँकेकडून मिळणाऱ्या कर्ज योजनेची माहितीही दिली आणि आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भर युवक निर्माण करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र नेहमी आपल्या सोबत राहील असे आश्वासन दिले.
सदरचे प्रशिक्षण कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने स्पर्धा परीक्षा विभाग, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र व एनएसएस विभागामार्फत आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालाजी सुरवसे यांनी सूत्रसंचालन डॉ. सतीश कामत तर आभार प्रा. कीर्ती पाटील यांनी मानले. यावेळी ब्युटी पार्लर व वायरमन प्रशिक्षणासाठी सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसह अन्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. केदार रेवडेकर उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.