*कोकण Express*
*देवगडमधील सुन्नी इज्तेमाला मिळाला चांगला प्रतिसाद*
*नशेच्या दुष्परिणामासहित इतर विषयांवर केले मार्गदर्शन*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सुन्नी इज्तेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. सुन्नी दावते इस्लामी तर्फे एक दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. सुन्नी दावते इस्लामीचे प्रमुख मौलाना शाकीर नुरी, कारी रिझवान खान, मौलाना रिझवी यांनी यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले.
इस्लामच्या शिकवणीप्रमाणे आचरण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. इस्लाममध्ये नशा करणे (व्यसनाधीनता) निषिध्द मानण्यात आली आहे. व्यसनांच्या विळख्यात सापडल्याने समाजाची व्यक्तीसह समाजाची अधोगती होते, त्यामुळे व्यसनांपासून दूर राहावे व इतरांना व्यसनांपासून दूर करण्याचा प्रयत्न करावा, नशामुक्त समाज उभारण्यास प्राधान्य द्यावे, माता पित्यांचा सन्मान करावा, त्यांची काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला. दैनंदिन जीवनातील विविध मुद्द्यांवर इस्लामची शिकवण सांगून त्याप्रमाणे आचरण करण्याचे आवाहन करण्यात आले. माफ करण्यास इस्लाममध्ये वेगळे महत्त्व आहे याचा उल्लेख करुन प्रत्येक बाबीत भांडण करणे, वैमनस्याची भावना बाळगणे याऐवजी माफ करण्यास प्राधान्य द्यावे असा सल्ला देण्यात आला. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना यावेळी मौलानांनी उत्तरे दिली.
देवगड शहरात रविवारी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यत हा मेळावा पार पडला. महिलांसाठी बैठकीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. या मेळाव्यासाठी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातून व गोवा मधून मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच सुन्नी इज्तेमा होता. मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्यांच्या वैद्यकीय सहाय्यतेसाठी वैद्यकीय पथक देखील सज्ज ठेवण्यात आले होते.
देवगड मुस्लिम सुन्नी कमिटीतर्फे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मुराद नाईक, जावेद खान यांच्यासहित इतरांनी यामध्ये मोठे योगदान दिले. सुन्नी दावते इस्लामीतर्फे मुंबईतील आझाद मैदानात गेल्या ३० वर्षांपासून नियमितपणे इज्तेमाचे आयोजन केले जाते. मेळावा यशस्वी होण्यासाठी पोलिस विभाग व प्रशासनाने केलल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.