*कोकण Express*
*परमहंस भालचंद्र महाराज यांचा सोमवारपासून जन्मोत्सव सोहळा…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संत शिरोमणी परमहंस भालचंद्र महाराज यांचा 119 वा जन्मोत्सव सोहळा सोमवार 9 जानेवारी ते शुक्रवार 13 जानेवारी 2023 या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या दिमाखात कनकनगरीत साजरा होणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबीर, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भाव-भक्तीगीत कार्यक्रम, दशावतारी नाटक, संगीत नाटक असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
परमहंस भालचंद्र महाराज यांचा प्रत्येक उत्सव हा भाविक भक्तांसाठी मांगल्याची आणि भक्तीभावाची पर्वणीच असते. जन्मोत्सव सोहळ्यात 9 ते 12 जानेवारी दरम्यान पहाटे 5.30 ते 8 काकड आरती, समाधीपूजा, अभिषेक, सकाळी 8 ते 12.30 सर्व भक्तांच्या कल्याणार्थ परमहंस भालचंद्र विष्णुयाग, दु. 12.30 ते 3 आरती व महाप्रसाद, दु. 1 ते 4 भजने, सायं 4 ते 8 सांस्कृतिक कार्यक्रम व त्यानंतर आरती असे कार्यक्रम होणार आहेत. 9 जानेवारी रोजी सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. तर 12 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत 119 रक्तदात्यांचे शिबीरात रक्तदान होणार आहे. शुक्रवार 13 जानेवारी रोजी भालचंद्र महाराजांचा 119 वा जन्मदिन आहे. या निमित्त पहाटे काकड आरती, समाधीपूजा, जपानुष्ठान, सकाळी 8 ते 9 भजने, 9 ते 11.30 समाधीस्थानी लघुरूद्र, सकाळी 9.30 ते 12 जन्मोत्सव कीर्तन (ह.भ.प भाऊ नाईक, वेतोरे), दु. 12 वा. जन्म सोहळा, द. 12.30 ते 3 आरती, महाप्रसाद तर सायं 5 वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची उंट, घोडे तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय यांच्या समवेत कणकवली शहरातून भव्य मिरवणूक व नंतर आरती होणार आहे. रात्री 12 नंतर कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर यांचा ब्रह्मसंकेत हा ट्रिकसीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. सोमवार 9 रोजी सायं. कणकवली शाळा नं. 3 च्या मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, 10 रोजी सायं. भालचंद्र दशावतार नाट्यमंडळ यांचे कंसवध हे दशावतार नाटक, 11 रोजी जयजय गौरीशंकर हे संगीत नाटक, 12 रोजी भाव भक्तीगीत संध्या, कथक नृत्य, 13 रोजी भक्तीगीत गायन कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तरी या सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.