*कोकण Express*
*होय… छत्रपती संभाजीराजे धर्मवीरच” – भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार*
*संगमेश्वर : प्रतिनिधी*
धर्मवीर छत्रपती शंभू राजांचा अखेरचा प्रवास ज्या ठिकाणी सुरू झाला त्या या भूमीत आपण सर्व शिवशंभू भक्त एक प्रतिज्ञा करूया, “दरवर्षी ११ मार्चला सकाळी ठीक ११:०० वाजता आपण सर्वांनी एकत्र येऊया, महाराष्ट्रातील सर्व वैचारिक वारसदारांना जमवून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विटंबनेचा तात्विक बदला घेण्यासाठी ऊर्जा मिळवून समाजात कार्य उभारूया.”
छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर हिंदवी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज तमाम मराठी मनाची अस्मिता आहे. त्यांच्याविषयी जाणीवपूर्वक अवमानकारक टिप्पणी करणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बड्या धेंडांचा आम्ही सर्व शिवशंभूप्रेमी जाहीर निषेध करतो. यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारे या लोकांची विटंबना होईल असे आंदोलन वा घोषणाबाजी न करता त्यांचे प्रबोधन होऊन बिघडलेले मानसिक संतुलन पूर्ववत होईल यासाठी शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून कार्यशाळा घेत आहोत.
वास्तविक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून आम्हाला अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दादा ‘राष्ट्रपुरुषांचा अपमान होऊ नये’ अशा आशयाचा ठराव विधानसभेत मांडत होते. मात्र ऐन शेवटच्या क्षणी दादांनी अनावश्यक विधान केले आणि काळजाचा ठोका चुकला. अहो अजित पवार यापूर्वी धरणात लघूशंका करण्याची भाषा करणारे तुम्ही, आता आमच्या श्रद्धेवरही घाला घालताय का? हे खपवून घेणार नाही. तुमचे आव्हाड म्हणतात, औरंगजेब क्रूर नव्हता. का? तर म्हणे तुळापूर येथे त्याच्या छावणीच्या शेजारी असणारे भगवान विष्णूचे मंदिर पाडले नाही म्हणून. वाह रे आव्हाड. किती द्वेष कराल हिंदू धर्माचा? मुघलांनी पाडलेल्या मंदिरांची यादी मिळवून अभ्यासा एकदा. क्षुद्र आणि नादान मानसिकतेचे तुमच्यासारखे नेते खऱ्या अर्थाने समाजाचे शत्रू आहेत.
” देव, देश आणि धर्मासाठी संभाजी महाराजांनी प्राणांची आहुती दिली.” असे म्हणता आणि धर्मवीर नव्हते असेही म्हणता. नेमक्या कोणत्या देवासाठी शंभूराजे लढले? कोण होते मूर्तीभंजक? बुतशिकन व कुफ्रशिकनचा काय अर्थ होतो? अल्लाउद्दीन खिलजीपासून पुढील काळात भारतात विस्तारलेला बौद्ध धर्म नामशेष होत जाण्यामागे नेमके कोणते कारण होते? बौद्धांच्या मूर्ती, लेणी, स्तूप कोणी फोडले? पर्शियाचा ईराण कसा झाला याबाबत विस्तृत माहिती घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे राजकारण करून स्वतःच्या तुंबड्या भरता आहात येत्या काळात शिवशंभू भक्त तुमची जागा नक्कीच दाखवून देतील.
छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. ते एक व्यक्ती नसून स्फुल्लिंग चेतवणारे यज्ञकुंड आहेत. छत्रपती संभाजीराजे त्यांचेच पुत्र. त्यामुळे शंभूराजांचे व्यक्तित्त्व धगधगते असणार हे स्वाभाविक. त्यांचे रूप घेऊन पैसा आणि लोकप्रियतेच्या जोरावर खासदारकी मिळू शकते पण विचारांचे काय? आचाराचे काय? दुर्दैवाने त्यासाठी खूप साधना करावी लागते. नुसती कोल्हेकुई करून भागत नाही.
अमोल मिटकरी सारखे ब्रिगेडी इतिहासकार फोफावले आहेत. त्यांना लोकांची मतीभ्रष्ट करून तरुणांना भरकटवण्यासाठी राष्ट्रवादीने मोठे केले आहे. शरद पवार, अजित पवार आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या मंडळींनी पवार साहेबांच्या राजकीय पित्याचे १९६१ सालचे मुंबईतील भाषण पुन्हा एकदा ऐकावे. यात तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणतात, “… पण छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं…? जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानच्या सीमा तुमच्या-आमच्या घरापर्यंत आल्या असत्या.” यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची महती लक्षात येते. आणि त्याच छत्रपतींना तुम्ही सेक्युलर बनवता? निदान मनाची तरी बाळगा रे. उद्धव ठाकरेंनी याबाबत मौन सोडून खडे बोल सुनावणे अपेक्षित होते. मात्र यापुढे कधीही न मिळणारी सत्तेची फळे चाखण्यासाठी ते मुळमुळीत भूमिका घेत आहेत.
४० दिवसांच्या भयावह हालअपेष्टा छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर बनवतात. तर कर्तव्यकठोर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अनेक धर्मप्रवर्तक घटना महाराज लौकिकार्थाने हिंदूहृदयसम्राट संबोधण्यास प्रतिबद्ध करतात. दोन संस्कृतींमधील फरक केवळ या दिव्य पितापुत्रांच्या अगम्य त्यागा मुळे स्पष्ट होतो.
त्यामुळे राष्ट्रवादी आणि एकंदरीत महाविकास आघाडीने आपल्या मर्यादांचे उल्लंघन करू नये. भारतीय जनता पार्टी छत्रपतींचा अवमान कदापि सहन करणार नाही याची खूणगाठ बांधुन ठेवावी.