*कोकण Express*
“ठेकेदारी’तील भ्रष्टाचाराला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच खतपाणी..!
*निविदा सोडाच,अंदाजपत्रक उपलब्ध नसताना देखील ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांच्या पाठबळाने कामे सुरू..?*
*सार्वजनिक बांधकाम विभागाचा “गोड” भ्रष्टाचार जिल्हावासीयांना भविष्यात”कडू” अनुभव देणार ? – प्रसाद गावडे*
जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारी कामे विना निविदा तर काही अंदाजपत्रकाशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने चालू झाली असून प्रशासकीय कार्यवाही पूर्ण न होताच ठराविक ठेकेदारांनी कामांना सुरुवात देखील केलेली दिसून येत आहे. त्यामुळे ह्या कामांवर नियंत्रण व देखरेख कोण ठेवणार, साहित्याची चाचणी कशी होणार, अंदाजपत्रकीय तरतुदीप्रमाणे साहित्य वापरात आणले गेले का याची पडताळणी कोण करणार,केलेली कामे किती दिवस टिकणार असे असंख्य प्रश्न उपस्थित होत असून कामाचा दर्जा न राखला गेल्यास लाखोंचा निधी पाण्यात वाहून जाणार आहे. ठेकेदारीतील भ्रष्टाचाराला पाठबळं देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण गंभीर दखल घेवून कारवाई करणार का असा सवाल मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी उपस्थित केला आहे. यापुढे कायदे व नियम ढाब्यावर बसवून मनमानी कारभाराला चाप लागणार की मंत्री महोदय पाठीशी घालणार हेच पाहणे औत्सुक्याचे आहे. बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी मर्जीतील ठेकेदारांची तळी उचलून कारभार हाकायला लागले मग बदल तो काय झाला? प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थेच असून हीच खरी जिल्ह्याची शोकांतिका आहे. विकासकामांच्या नावाखाली अधिकारी व ठेकेदारांच्या तुंबड्या भरल्या जात असतील तर महाराष्ट्र सैनिक ते कदापि खववून घेणार नाहीत असा इशारा प्रसाद गावडे यांनी दिला आहे.