*कोकण Express*
*श्री. मकरंद आपटे यांना कोकणरत्न पुरस्कार*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेमध्ये संस्कृत व इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट अध्यापक श्री. मकरंद नारायण आपटे यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्ल महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी तर्फे सन्मा. आमदार श्री. बाळाराम पाटील यांच्या हस्ते कोकणरत्न पुरस्कार २०२२ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न झाला. संस्कृत विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून श्री. मकरंद आपटे सर यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये ख्याती आहे. गेस्ट लेक्चरर म्हणून अनेक शाळांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आतापर्यंत प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. इंग्रजी विषयामध्ये सुद्धा त्यांचा हातखंडा आहे.*
*क्रीडा शिक्षक नसताना सुद्धा खेळामधील आवड म्हणून ते विद्यार्थ्यांना कॅरम व बॅडमिंटन या खेळांचे खास प्रशिक्षण देतात. आतापर्यंत त्यांच्या दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावर तर १७ विद्यार्थ्यांची राज्य स्तरावर निवड झाली आहे. पैकी कु. दिक्षा नंदकिशोर चव्हाण हिने तर सलग दोन वर्षे राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक प्राप्त केले आहे.*
*आतापर्यंत श्री. आपटे सर यांनी ८ वेळा रक्तदान तर १ वेळा प्लेटलेट्स दान करून सामाजिक क्षेत्रात सुद्धा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जिल्हास्तरीय श्रीमद्भगवद्गीता पाठांतर स्पर्धा तसेच ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा यांचे ते आयोजक म्हणून ते उत्कृष्ट काम पाहतात.*
*आजपर्यंत महात्मा फुले गुरूगौरव पुरस्कार २०१७, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आदर्श कार्यकर्ता पुरस्कार २०१८, संस्कृत विषयामधील उत्कृष्ट शिक्षकांसाठी दिला जाणारा आचार्य द्रोणाचार्य पुरस्कार २०१८, परफेक्ट अकॅडमी तर्फे आचार्य शिरोमणी पुरस्कार २०२२, सिंधुदुर्ग लाईव्ह गुरूगौरव पुरस्कार २०२२ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला गेला आहे.*
*श्री. मकरंद आपटे सर यांच्या शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी तर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती खजिनदार सन्मा. श्री. गणपत सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी श्री. मकरंद आपटे सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.*