*कोकण Express*
*मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार अमित खोत, परेश सावंत, संदीप बोडवे याना जाहीर*
*5 जानेवारी रोजी होणार पुरस्कार वितरण*
*मालवण ः प्रतिनिधी*
तालुका पत्रकार समितीच्यावतीने दिला जाणारा सन २०२२ या वर्षासाठीचा कै. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अमित खोत यांना कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पत्रकार पुरस्कार परेश सावंत यांना तर बेस्ट स्टोरी अवार्ड पत्रकार पुरस्कार संदीप बोडवे यांना जाहीर झाला आहे. ५ जानेवारीला येथील कार्यक्रमात माजी खासदार निलेश राणे, पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. अशी माहिती पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे यांनी दिली. तालुका पत्रकार समितीची बैठक काल कुंभारमाठ येथील हॉटेल सॅफरॉन येथे समिती अध्यक्ष संतोष गावडे यांच्या BADO अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रफुरत देसाई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश सरनाईक, सचिव कृष्णा दोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर, सहसचिव परेश सावंत, उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, अमित खोत, कुणाल मांजरेकर, उदय बापर्डेकर, अनिल तोंडवळकर, संदीप बोडवे, आप्पा मालंडकर, संग्राम कासले, विशाल वाईरकर, नितीन गावडे, समीर म्हाडगुत, गणेश गावकर यांच्यासह तालुक्यातील समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पत्रकार समितीच्यावतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पत्रकार दिन पूर्वसंध्येला ५ जानेवारीला तालुका पत्रकार समितीच्या वतीने पत्रकार पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित केला जातो. हा सोहळा ५ जानेवारीला निश्चित करण्यात आला आहे. मान्यवर, निमंत्रित यासह पत्रकार सदस्य व कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. मालवण पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या तीन पुरस्काराच्या वितरणासह जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार जाहीर तसेच चिरेखाण संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल संतोष गावडे, तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मोठ्या मतांनी विजयी होत संघाच्या उपाध्यक्ष पदी निवड झालेले कृष्णा ढोलम यांचा तर ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदी निवडून आलेल्या पी. के. चौकेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार आहे अशी माहिती समिती अध्यक्ष श्री. गावडे यांनी दिली.