*कोकण Express*
*अक्षरवाङ्ममय प्रकाशनातर्फे संशोधक विद्यार्थ्यांसाठी दत्तक पालक योजना*
*महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बोलींच्या अभ्यासाचे संशोधन*
*अक्षरवाङ्ममयचे बाळासाहेब धोंगडे यांची माहिती*
*कणकवली/ प्रतिनिधी*
कोकणातल्या विविध लेखकांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने कोकणातल्या साहित्य चळवळीला जोडल्या गेलेल्या अक्षरवाङ्ममय प्रकाशन आणि प्रगती टेक यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री-ज्योती संशोधक दत्तक पालक योजना राबविण्यात येत असून या योजनेसाठी होतकरू संशोधक दोन विद्यार्थ्यांचे (एक मुलगी, एक मुलगा) पालकत्व स्वीकारण्यात येत असल्याची माहिती अक्षरवाङ्ममय प्रकाशनाचे संचालक – संपादक बाळासाहेब धोंडगे यांनी दिली.
या संशोधन दत्त पालक योजनेसाठी स्नेहल मधुकर पवार या संशोधन विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे.या विद्यार्थिनीसाठी “महानुभाव व वारकरी संप्रदायातील संत कवयित्रींच्या काव्यातील स्त्रीजाणिवांचा चिकित्सक अभ्यास” हा विषय देण्यात आला असून मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ. संदीप तापकीर यांना मार्गदर्शक म्हणून नेमण्यात आले आहे. स्नेहल पवार हिचे संशोधन केंद्र मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल.
दुसरे पालकत्व सागर सुरवसे या संशोधक विद्यार्थ्यांचे स्वीकारण्यात आले असून त्याला संशोधनासाठी सीमावर्ती प्रदेशातील मराठी बोलींचा अभ्यास (महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग) हा विषय देण्यात आला आहे.त्याला मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉ. राजशेखर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.सागर सुरवसे याचे संशोधन केंद्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असेल.
दरम्यान या संशोधक विद्यार्थ्यांचे संशोधन पूर्ण झाल्यावर या लेखनाचे ग्रंथ प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी जेष्ठ कादंबरीकार राजन गवस, ज्येष्ठ समीक्षक सुधाकर शेलार यांच्या शिफारसी घेण्यात येणार आहेत. या दोन मान्यवरांच्या शिफारसीची ग्रंथ प्रसिद्ध करण्यास अनुकूलता लाभल्यास हे दोन्ही लेखनाचे ग्रंथ देखण्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्याची रॉयल्टी या दोन संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती बाळासाहेब धोंगडे यांनी दिली.